विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागविण्याची धडपड

देवलापारचे शिक्षक उल्हास इटनकर यांचा प्रयोेगशील शिक्षणाचा ध्यास

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर,
nagpur news कायद्याची पदवी संपादन केली. पण शिकविण्याच्या ध्यासाने शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. योग आणि नॅचरोपॅथीमध्येही प्रावीण्य मिळविले. त्याही पुढे ‘ग्रामगीताचार्य’ ही पदवी प्राप्त केली. मात्र, या सर्वांतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी एका ध्येयासाठी करण्याचे ठरविले, ते म्हणजे, ‘विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्यांच्यामध्ये सामाजिक भान जागविणे’. देवलापार या छोट्याशा गावातील स्वामी विवेकानंद विद्यालय हीच त्यांची प्रयोगशाळा ठरली. या प्रयोगशील शिक्षकाचे नाव आहे उल्हास वामनराव इटनकर.
 
nagpur news
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले उल्हास इटनकर हे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात शिक्षण झाल्याने आदिवासी बांधवांसाठी कार्य करण्याची तळमळ त्यांच्यात निर्माण झाली. त्यांच्या आईचे शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. आईचे हे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी इटनकर यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. विद्यार्थ्यांना उद्याचा आदर्श नागरिक म्हणून घडवायचे असेल तर त्यांच्या मनावर योग्य संस्कारांची रुजवणूक होणे आवश्यक असल्याचे इटनकर यांचे मत आहे. त्यामुळे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संस्कारात्मक आणि सामाजिक उपक्रमांची जोड दिली. विविध गटांची रचना करून शिक्षणाची मोट बांधली. ‘योगदान’ प्रकल्पाच्या माध्यमातून वाचन चळवळ सुरू केली. या उपक्रमाचा प्रभाव इतका व्यापक झाला की, त्ही त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तकदानाचा उपक्रम राबवित आहेत. आदिवासी भागात स्वच्छतेची चळवळ त्यांनी स्वतःच्या वर्गापासून सुरू केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या सामाजिक जाणिवेमुळे आज गावातील नागरिकही स्वच्छतेसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. बसस्टॉप वाचनालय, झोला वाचनालय यांसारख्या अभिनव संकल्पनांच्या माध्यमातूनही इटनकर वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी विकसित करण्याचा त्यांचा हा प्रयोगशील प्रवास आजही अविरत सुरू आहे.
 
पेटंट मिळविणारा प्रयोगशील शिक्षक
दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने इटनकर यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. एका हाताने दिव्यांग असलेल्या व्यक्तीलाही सहजपणे नखे कापता यावीत, यासाठी त्यांनी विशेष उपकरण विकसित केले असून, या अभिनव यंत्राला पेटंट मिळाले आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तीला केवळ एका हाताने सहजपणे वापरता येईल, असे विशेष लॉकही त्यांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे, हे लॉक केवळ एक नट, एक बोल्ट आणि खेळण्यातील मोटार यांच्या साहाय्याने तयार करण्यात आले आहे.
 
 
आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या उल्हास इटनकर यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार-२०२४’ प्रदान केला आहे. त्यांच्या शैक्षणिक साहित्याला तब्बल १० जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०१० मध्ये नंदुरबार येथे, तसेच २०२४ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही त्यांच्या उपक्रमांना प्रथम क्रमांकाचा गौरव प्राप्त झाला. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदविला आहे. अभ्यासक्रम निर्मिती, बालभारती समिती तसेच विविध राज्यस्तरीय समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.