नागपुरात मल्टीलेयर साऊंड सिस्टिम’वरच कारवाई!

डीजेबंदीवर नांगरे पाटलांचे स्पष्टीकरण

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Nangre Patil's clarification on the DJ ban शहरातील डीजे बंदीवरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असतानाच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजे बंदीच्या अधिसूचनेबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेतली. डीजे बंदीची मागणी सर्वप्रथम संदीप जोशी यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पोलीस आयुक्तांनी नागपुरात डीजे बंदीसंदर्भात अधिसूचना जारी केली. मात्र, ही अधिसूचना केवळ ६० दिवसांसाठी असल्याने कायमस्वरूपी बंदीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर संदीप जोशी यांनी सरसकट आणि कायमस्वरूपी डीजे बंदीची मागणी केली. मल्टीलेयर साऊंड सिस्टिमबाबतही पोलीस आयुक्तांनी सविस्तर भूमिका मांडली. अधिसूचनेच्या शेवटच्या परिच्छेदात ज्या साऊंड सिस्टिममधून आवाज येतो, त्या प्रत्येक सिस्टिमवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मल्टीलेयर साऊंड सिस्टिमचा अधिसूचनेत स्पष्ट उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सिस्टिममध्ये बेस, मिडीयम आणि टॉप असे तीन लेअर असतात. 
 
 
 
Nangre Patil
 
यातील बेसमुळे कंपन निर्माण होतात आणि त्यातून शारीरिक नुकसान होऊ शकते, असा दावा नांगरे पाटील यांनी केला. या कारणामुळे पुढील ६० दिवस मल्टीलेयर साऊंड सिस्टिमविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ६० दिवसांची मुदत संपल्यानंतरही या अधिसूचनेचे १०० टक्के नूतनीकरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या ६० दिवसांची अधिसूचना असली तरी त्यानंतरही कारवाईची भूमिका कायम राहणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.
 
 
दुसरीकडे, भाजपमधूनच या निर्णयाला विरोधाचे सूर उमटले आहेत. मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केवळ हिंदू सणांच्या काळातच डीजे बंदी का, असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिसांनी डीजे बंदीसंदर्भात जारी केलेली अधिसूचना तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर संदीप जोशी यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. यावेळी डीजे बंदीच्या समर्थनात असलेले कार्यकर्ते आणि नागरिकही उपस्थित होते. पत्रकार परिषदेत विश्वास नांगरे पाटील यांनी अधिसूचनेमागील कायदेशीर बाब स्पष्ट केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात BNSS मधील कलम १६३ अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्तांना जास्तीत जास्त ६० दिवसांसाठी अशी अधिसूचना जारी करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कालावधीत येणाऱ्या सण-उत्सवांचाही अधिसूचनेत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये मल्टीलेयर डीजेसोबत लेझर लाईट आणि बीम लाईटचाही समावेश आहे.
 
ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कारवाईचा धार्मिक सणांशी संबंध नसल्याचे सांगताना नांगरे पाटील यांनी स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचाही उल्लेख केला. आपण सिद्धिविनायक मंदिरात जातो तसेच नागपुरातील टेकडी गणेश मंदिरातही जातो आणि आपल्या दिवसाची सुरुवात गणपती स्तोत्राने होते, असे त्यांनी सांगितले. उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवण्यास किंवा संगीताला बंदी नसून, मर्यादा ओलांडून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मल्टीलेयर साऊंड सिस्टिमवरच कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मल्टीलेयर साऊंड सिस्टिममध्ये टॉप, मिडीयम आणि बेस असे तीन स्तर असतात. त्यासोबत लेझर आणि बीम लाईटचा वापर केला जातो. या सर्वांचा मिळून रॅडिकल ऑडिओ-व्हिज्युअल एक्सपिरीयन्स तयार होतो आणि त्यामुळे हॅल्युसिनेशनसारखी अवस्था निर्माण होऊ शकते, असा दावा पोलीस आयुक्तांनी केला. यामुळे तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.