‘त्या’ नराधमाची धिंड काढा, फाशी द्या

आ. राणा यांच्या नेतृत्वात जमावाची मागणी

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अमरावती
murder of a young woman  महाविद्यालयीन तरुणीच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अटकेतल्या आरोपीची गावागावातून धिंड काढा व सदर प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून आरोपीस फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील जमावाने गुरुवारी राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक देऊन पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्याकडे केली.
 
ravi rana
१७ वर्षीय तरुणीच्या हत्येमुळे समाजमन सुन्न झाले असून त्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. आ. राणा यांनी सदर हत्येच्या प्रकरणात आरोपीसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना आरोपी करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. अमरावती शहरात महिला व युवतींची सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रभावी निगराणी व्यवस्था निर्माण करा, अल्पवयीन मुले व युवकांकडून चायना चाकू व इतर धारदार शस्त्रांचा वापर करणाऱ्यावर तडीपारीची व मोक्का अंतर्गत कारवाई करा, शहरातील अवैध धंदे तसेच एम.डी., गांजा विक्री, सेवन व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवा, प्रमुख चौकांमध्ये हुल्लडबाजी करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांवर कठोर करा, हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी उपरोक्त उपायोजना तातडीने कराव्या, अशी मागणीचे निवेदन आ. राणा यांनी नागरिकांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तांना दिले.
गोंदियातून अटक, पोलिस कोठडी
तरुणीची हत्या करणारा आरोपी आनंद भड रा. पोही मूर्तिजापूर हा घटनेनंतर रेल्वेत बसून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला बुधवारी रात्रीच ताब्यात घेतले व अमरावतीत आणले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिस सदर घटनेत आरोपीला आणखी कोणाची मदत झाली व संपूर्ण घटनाक्रम चौकशी दरम्यान जाणून घेणार आहे.