स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी!

४८ तासाच्या आत फसवणुकीचा गुन्हा उघडकीस साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वाशीम, 
Performance of Washim Crime Branch फसवणुक करून सोन्याची चेन व दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास करणार्‍या चोरांचा माग घेत वाशीम येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४८ तासाच्या आत आरोपीच्या घरी धडकले. दरम्यान आरोपीने मात्र, पोलिस येत असल्याचे बघुन त्याने तेथुन पळ काढला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चोरी केलेला सोन्याचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
 

washim 
शहरामध्ये १ सप्टेंबर रोजी अडीच वाजता दरम्यान देवेंद्र ओंकारसिंह किल्लेदार हे सोनखास रोडने जात असताना अज्ञात दोन आरोपींनी त्यांना थांबवुन पोलिस असल्याची बतावणी केली व मागे लुटमार झाली आहे. तुमच्या गळ्यातील गोफ व अंगठ्या काढून ठेवा असे म्हणुन हातचलाखीने आरोपींनी त्यांच्या जवळच्या बनावट अंगठ्याची कागदाची पुडी देवुन देवेंद्र किल्लेदार यांची सोन्याची चेन वजन अंदाजे ३० ग्रॅम, १६ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. उपरोक्त प्रकरणी फसवणुक केल्यावरुन पोलिस स्टेशन वाशीम शहर येथे भान्यासं अन्वये विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर जिपोअ निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि सुधाकर आडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
सदर गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी अंमलदार यांनी तांत्रीक दृष्टीने तपास करुन व मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन सदर गुन्हा हा हसन अली शेखु बेग, (वय ३५) रा. इराणी गल्ली, शिवाजी नगर, परळी वैजनाथ जि. बिड याने व त्याचे साथीदाराने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. सदर पथक ३ सप्टेंबर रोजी परळी वैजनाथ येथे स्थानिक पोलिसांची मदत घेवुन आरोपीचा त्याच्या राहते घरी शोध घेण्याकरीता गेले. पोलिसाचे वाहन इराणी वस्तीत येत असल्याचे पाहुन आरोपी हसन अली शेखु बेग हा घरासमोरुन मोटर सायकलने पळुन जाताना दिसला. पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल एक सोन्याची चेन व सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु असून, आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. सदर कारवाई जिपोअ निकेश खाटमोडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुधाकर आडे यांचे नेतृत्वात सपोनि योगेश धोत्रे, पोलीस अंमलदार गजानन झगरे, अशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, दिपक घुगे, संतोष वाघ, सुनिल तायडे यांनी केली.