अनिल कांबळे
नागपूर,
cctv footage मागील तीन-चार दिवसांपासून शाळेत जात नसल्याने आईने रागावून मंगळवारी शाळेत जाण्यास सांगितल्यानंतर नऊ वर्षीय मुलगी घरातून निघाली; मात्र ती शाळेत पोहोचलीच नाही. ती घरीही परतली नसल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. देवांशी (९), रा. शारदा नगर, असे बेपत्ता मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांशी मागील तीन-चार दिवसांपासून शाळेत जात नव्हती. मंगळवारी सकाळी तिच्या आईने तिला रागावून शाळेत जाण्यास सांगितले. त्यानंतर देवांशीने शाळेचा गणवेश घातला आणि सकाळी सुमारे ७ वाजता घरातून शाळेत जात असल्याचे सांगून निघाली. मात्र, ती शाळेत पोहोचली नाही आणि घरीदेखील परतली नाही.
दुपारपर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच परिसरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी पारडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून शाळा, शेजारी तसेच नातेवाईक आणि परिचितांकडूनही माहिती घेतली जात आहे. देवांशीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी तपास करीत आहे.