अनिल कांबळे
नागपूर,
crop loan scam निरक्षर आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) तब्बल ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कृषी कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील प्रमुख आरोपीला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. सचिन खुशाल कारेमोरे (४०, रा. नेरी, ता. मोहाडी, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या टोळीतील सदस्यांनी गरीब, निरक्षर तसेच अल्पशिक्षित शेतकऱ्यांना हेरून त्यांची फसवणूक केली. शासनाकडून दरवर्षी १० हजार रुपये पीक नुकसानभरपाई मिळते, असे सांगून त्यासाठी एसबीआयमध्ये खाते उघडणे आवश्यक असल्याचे भासविण्यात आले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, सातबारा उतारा यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली. यानंतर शेतकऱ्यांना एसबीआयच्या शाखांमध्ये नेऊन इंग्रजी भाषेतील कर्जाच्या कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना कागदपत्रांमधील मजकूर समजत नसल्याचा फायदा घेत त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कृषी कर्जे उचलण्यात आली. त्यानंतर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा विविध खात्यांमध्ये वळवून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.crop loan scam या माध्यमातून एसबीआयच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये, तर रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजार रुपये उचलण्यात आले. या प्रकरणात मौदा आणि रामटेक पोलिस ठाण्यांत एकूण १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
बनावट वेअरहाऊस परवान्यांचा वापर
ईओडब्ल्यूच्या सखोल तपासात टोळीचा आणखी मोठा कारनामा उघडकीस आला. आरोपींनी दिल्लीतील वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी कडून बनावट गोदाम परवाने मिळविल्याचे समोर आले. या परवान्यांच्या आधारे बनावट इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्स तयार करून त्या एसबीआयकडे तारण म्हणून सादर करण्यात आल्या. त्याआधारे कोट्यवधी रुपयांची कर्जे उचलण्यात आली.
आधीही धान्य घोटाळ्यांत सहभाग
कारेमोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भंडारा, गडचिरोली आणि अहेरी परिसरात धान व धान्य खरेदीतील फसवणुकीचे यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात कारेमोरे अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने मागील महिन्यात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, बुधवारी कारेमोरे नागपूर रेल्वे स्थानकावरून राज्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक केली.नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ईओडब्ल्यूच्या पथकाने कारेमोरे याला ताब्यात घेतले.