नवी दिल्ली,
pulwama accused पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद इक्बाल राथरला दिल्लीतील NIA न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. बहिणीच्या लग्नासाठी ५ ते १० सप्टेंबरदरम्यान १० दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, अशी मागणी राथरकडून करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींना प्राधान्य देत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे राथरला प्रत्यक्ष लग्न समारंभात उपस्थित राहता येणार नाही. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून कोर्टाने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लग्नात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

मोहम्मद इक्बाल राथर हा पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणातील सहावा आरोपी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्याला मुख्य आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद उमर फारूक याला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ, फुटलीपुरा येथील रहिवासी असलेल्या राथरने एप्रिल २०१८ मध्ये उमर फारूक भारतात घुसखोरी केल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेले आयईडी (IED) वाहन तयार करण्याची भूमिका उमर फारूकने बजावली होती. त्यानंतर २९ मार्च २०१९ रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत उमर फारूक आणि कामरान हे दोघे ठार झाले होते. या प्रकरणाच्या तपासात राथरला सहावा आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
२५ वर्षीय इक्बाल राथरचे पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्क असल्याचे तपासात समोर आले होते. मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून तो त्यांच्याशी संवाद साधत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, सप्टेंबर २०१८ मधील झाज्जर-कोटली चकमक प्रकरणात राथर आधीपासूनच न्यायालयीन कोठडीत होता, बहिणीच्या विवाहासाठी काही दिवसांची तात्पुरती सुटका मिळावी, अशी राथरची मागणी असली तरी न्यायालयाने सुरक्षेशी संबंधित बाबींना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थितीची परवानगी नाकारण्यात आली. मात्र त्याला कुटुंबीयांच्या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होता यावे, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय देण्यात आला आहे.