आगरकरांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह!

रोहितबाबत सैकियांचे मोठे विधान

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |

मुंबई,
question mark over Agarkar's future भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अनुपस्थितीमुळे बीसीसीआयच्या बैठकीनंतर क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे. गुरुवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित असलेले अनेक प्रमुख सदस्य हजर होते, मात्र आगरकर मात्र बैठकीत दिसले नाहीत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आगरकर शहराबाहेर असल्याने बैठकीला येऊ शकले नसल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला देवजित सैकिया यांच्यासोबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि CoE प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर तसेच कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल उपस्थित होते. आगरकर मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी असल्याने ऑनलाइनही सहभागी होऊ शकले नाहीत, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघ निवडताना सर्व निवडकर्त्यांनी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यामुळे आगरकरांच्या अचानक गैरहजेरीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरुवात झाली.
 

question mark over Agarkar 
 

बैठकीनंतर सैकिया यांनी आगरकरांच्या अनुपस्थितीमागे कोणताही वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. ही बैठक कमी वेळेच्या सूचनेवर आयोजित करण्यात आली होती आणि त्यामुळे आगरकर उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच ही निवड समितीची बैठक नव्हती आणि त्यात कोणत्याही निवडीसंदर्भात चर्चा झाली नसल्याचेही सैकिया यांनी स्पष्ट केले. मात्र, याच पार्श्वभूमीवर आगरकर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील संबंधांबाबतच्या जुन्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान अजित आगरकर यांनी रोहित शर्माला निवृत्तीचा सल्ला दिल्याची चर्चा यापूर्वी समोर आली होती. रोहितने त्याला सहमती दर्शवल्याचेही बोलले गेले, मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावल्याने परिस्थिती बदलल्याची चर्चा आहे. रोहितच्या निवृत्तीबाबत सैकिया यांना विचारले असता त्यांनी रोहित प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत असून गेल्या सामन्यातही त्याने शतक झळकावल्याचे सांगत या चर्चांवर प्रश्न उपस्थित केला.
 
 

आगरकर मुख्य निवडकर्ता झाल्यानंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेत शुभमन गिलकडे सोपवण्यात आली. त्यामुळे आगरकर आणि रोहित यांच्यातील कथित मतभेदांच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, या सर्व चर्चांमागील नेमके सत्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अजित आगरकर यांचा मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यकाळ पुढील वर्षी जुलैमध्ये संपणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्यामुळे विश्वचषकापर्यंत आगरकरांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले असले तरी, त्यांच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळालेला नाही.