दिल्ली विमानतळावर पावसाचा कहर!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
delhi airport दिल्ली आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विमानतळाच्या काही भागांत पाणी साचल्याने अनेक विमानांच्या वेळापत्रकात बदल झाला असून, दिल्लीकडे येणाऱ्या काही देशांतर्गत विमानांना विलंब होत आहे. अहमदाबाद, मुंबई आणि पोर्ट ब्लेअर येथून दिल्लीला येणाऱ्या विमानांनाही याचा फटका बसला आहे.
 
delhi airport
 
शुक्रवारी दिल्लीच्या आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला असून, संध्याकाळपर्यंत सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. पावसामुळे विमानतळावरील प्रतीक्षा कक्षासह काही भागांत पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे विमानतळावर पोहोचणाऱ्या प्रवाशांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
या परिस्थितीनंतर इंडिगोने प्रवाशांना प्रवासापूर्वी त्यांच्या विमानाची सद्यस्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील खराब हवामानामुळे उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. विमानतळाकडे जाताना रस्त्यांवर वाहतूक मंदावण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी घरातून अतिरिक्त वेळ घेऊन निघावे, असेही सांगण्यात आले आहे.
 
एअर इंडियानेही दिल्लीला येणाऱ्या आणि दिल्लीहून जाणाऱ्या विमानांवर खराब हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रवाशांनी विमानतळासाठी रवाना होण्यापूर्वी फ्लाइटची नवीनतम स्थिती तपासावी, असे आवाहन कंपनीने केले आहे. त्यामुळे दिल्लीहून किंवा दिल्लीला विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचे अपडेट तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.