रणबीर-आलिया-विकीचा ‘लव्ह अँड वॉर’!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
मुंबई,
love and war ‘लव्ह अँड वॉर’ या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण अखेर पूर्ण झाले आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता टीम पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामाकडे वळणार आहे. या तिन्ही कलाकारांना पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहता येणार असल्याने चित्रपटाबाबत आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
 
love and war
 
चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने भावनिक निरोप घेत शूटिंगचा समारोप केला. दीर्घकाळ सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी हा क्षण कलाकार आणि क्रूसाठी विशेष ठरला. आता संपादन, पार्श्वसंगीत, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रोडक्शन डिझाइनसह पोस्ट-प्रॉडक्शनची उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये या तांत्रिक बाबींना विशेष महत्त्व असल्याने पुढील टप्पाही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.
चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप फारशी माहिती जाहीर केलेली नाही. ‘लव्ह अँड वॉर’ हा प्रेम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित रोमँटिक वॉर ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे. नातेसंबंध आणि भावनांभोवती कथा गुंफण्यात आली असून, कथानक सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूकही अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. त्यामुळे ट्रेलर आणि प्रमोशनल मोहिमेकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
 
‘लव्ह अँड वॉर’ २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या वीकेंडचा फायदा या चित्रपटाला मिळण्याची अपेक्षा आहे. हिंदीसोबत तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी ऋषभ शेट्टीच्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाचेही प्रदर्शन नियोजित असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार आहे.
 
आलिया भट्ट यापूर्वी ‘अल्फा’मध्ये दिसली होती, तर रणबीर कपूरचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट ‘ॲनिमल’ होता. रणबीर ‘रामायण’मध्येही दिसणार असून हा चित्रपट दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलचा शेवटचा चित्रपट ‘छावा’ होता आणि तो आता ‘महावतार’मध्ये दिसणार आहे. त्यामुळे ‘लव्ह अँड वॉर’मध्ये या तिन्ही कलाकारांची एकत्रित जोडी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.