'रोहित'वर BCCI ची दोन वर्षांची बंदी!

जन्मतारखेत वारंवार बदल केल्याचा आरोप

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rohit yadav and bcci भारतीय अंडर-19 संघात स्थान मिळवलेल्या युवा क्रिकेटपटू रोहित यादवच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित यादववर दोन वर्षांची बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, संघ निवडीनंतर काही काळातच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्पोर्टस्टारने सूत्रांच्या हवाल्याने या कारवाईला दुजोरा दिला असून, रोहितने नोंदणीच्या विविध टप्प्यांवर आपल्या जन्मतारखेत बदल केल्याचे समोर आले आहे.
 
 
 
rohit
 
रोहित यादव यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या अंडर-19 संघाचा भाग होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्धच्या एकदिवसीय आणि मल्टी-डे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. ही मालिका या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार होती. मात्र, जन्मतारखेशी संबंधित प्रकरणामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आल्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला मोठा ब्रेक लागला आहे.रोहित यादवच्या जन्मतारखेबाबतच्या नोंदींमध्ये वेगवेगळ्या वर्षांत बदल झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. २०१४ मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडे त्याची नोंदणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची जन्मतारीख ७ जुलै २००७ अशी नोंद होती आणि त्याचा पत्ता उत्तर प्रदेशचा होता. त्यानंतर २०१७ मध्ये आधार कार्ड अपडेट करण्यात आले, तेव्हा त्याचे जन्मवर्ष २००६ करण्यात आले. २०२० मधील आधार कार्डच्या अपडेटवेळीही जन्मवर्ष २००६ होते, मात्र त्यानंतर त्यात पुन्हा बदल करण्यात आला.
२०२१ मध्ये रोहित यादवचे जन्मवर्ष बदलून २००९ करण्यात आले. २०२४ पर्यंत करण्यात आलेल्या अपडेटमध्येही जन्मवर्ष २००९ असेच ठेवण्यात आले. या कालावधीत त्याच्या पत्त्यातही बदल करण्यात आला. सुरुवातीला उत्तर प्रदेशचा पत्ता असलेल्या रोहितच्या नोंदीमध्ये नंतर हावडा हा पत्ता करण्यात आला.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर BCCIने वर्षाच्या सुरुवातीलाच खेळाडूंच्या वयाशी संबंधित नोंदींची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. BCCIच्या निर्देशानुसार क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने रोहित यादवच्या वयासंदर्भातील नोंदींची तपासणी सुरू केली. चौकशीनंतर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झालेली असतानाच ही कारवाई झाल्याने आता भारतीय संघात त्याच्या जागी नव्या खेळाडूची निवड केली जाणार असून, त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.