निर्बंधांची पर्वा नाही; भारताला तेल पुरवणार रशिया!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Russia to supply oil to India. भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा सहकार्याबाबत मॉस्कोकडून पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी भारताच्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. दबाव निर्माण झाला तरी भारताने अनेक वेळा स्वतःची भूमिका कायम ठेवत राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्याची क्षमता दाखवून दिली आहे, असे त्यांनी म्हटले.भारत-रशिया ऊर्जा सहकार्याबाबत रशियाला किती विश्वास आहे, या प्रश्नावर अलिपोव्ह यांनी भारताच्या भूमिकेच्या संदर्भातून उत्तर दिले. तेल व्यापाराशी संबंधित निर्बंध आणि शुल्कामुळे दोन्ही देशांच्या ऊर्जा सहकार्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, भारताच्या गरजेनुसार रशियाकडून तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘भारताला जितके तेल लागेल तितके तेल देण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
 
 
fd546567
 
दरम्यान, निर्बंध आणि शुल्कांच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याच्या धोरणावरही अलिपोव्ह यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, काही देश सहकार्य आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दबावाचे धोरण वापरत आहेत. अशा परिस्थितीचा रशियन तेलाच्या माध्यमातून भारताला मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.रशियन तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारातून पूर्णपणे दूर करण्याचे प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होऊ शकतो, असा दावा अलिपोव्ह यांनी केला. सध्याच्या ऊर्जा बाजारात रशियन तेलाची उपलब्धता दुर्लक्षित करणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले. रशियन तेल भारतासह इतर देशांसाठीही बाजारात उपलब्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
रशियाला भारताला तेल विकण्यात रस आहे, तर भारतालाही आपल्या गरजेनुसार रशियन तेल खरेदी करण्यात रस असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती, पुरवठ्याची स्थिती आणि व्यापारावरील निर्बंध यांचा देशाच्या ऊर्जा खर्चावर परिणाम होऊ शकतो. रशिया हा भारताचा दीर्घकाळापासून प्रमुख तेल पुरवठादार राहिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा व्यापार हा केवळ द्विपक्षीय व्यापारापुरता मर्यादित नसून भारताच्या ऊर्जा सुरक्षेशीही जोडलेला महत्त्वाचा मुद्दा आहे.