समीर चौघुलेंची भावनिक आठवण

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
मुंबई,
sameer choughule ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले आपल्या विनोदी अभिनय आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना हसवणाऱ्या समीर चौघुले यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मात्र त्यांच्या आयुष्यातील भावनिक आठवण सांगितली. क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सचिन आपल्यासाठी देव असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर सचिनने भारतासाठी चांगली कामगिरी करावी म्हणून आपण अनेकदा उपवास केल्याचेही त्यांनी सांगितले.
 
sameer choughule
 
समीर चौघुले यांनी नुकतीच ‘इसापनीती टॉक्स’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांवर भाष्य केले. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सचिनसाठी आपण उपवासही केला आहे. सेन्चुरिअन पार्क येथे वर्ल्ड कपची मॅच असताना सचिनने भारताला विजय मिळवून द्यावा, या इच्छेने सकाळपासून पाणीही न पिता आपण उपवास केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.आपल्या उपवासाचा आणि सचिनच्या विजयाचा एक वेगळाच संबंध असल्याचेही समीर चौघुले मिश्कीलपणे सांगतात. जेव्हा जेव्हा आपण सचिनसाठी उपवास केला, तेव्हा सचिनने मॅच जिंकून दिली, त्यामुळे आपल्या उपवासामुळेच सचिनने सामना जिंकला असावा, असे आपले म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्या मुलाला क्रिकेटमध्ये फारसा रस नसला तरी आपल्या आयुष्यात क्रिकेटला धर्माचे स्थान होते आणि क्रिकेटसाठी आपण खूप काही केले असल्याचे चौघुले यांनी स्पष्ट केले.