शनाकाचा धडाका! ३९ चेंडूत शतक!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
सेंट किट्स,
shanaka on a rampage century off 39 balls कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार दसुन शनाकाने आपल्या आक्रमक फलंदाजीने खळबळ उडवून दिली. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना शनाकाने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने सीपीएलमधील वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स आणि सेंट लुसिया किंग्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पॅट्रियट्सला सुरुवातीलाच धक्का बसला. सलामीवीर काईल मेयर्स केवळ १ धावेवर बाद झाला. त्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि आंद्रे फ्लेचर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या दसुन शनाकाने मात्र मैदानात उतरताच सामन्याचा रंगच बदलला. त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या ३९ चेंडूत शतक ठोकले.
 
shanaka on a rampage century off 39 balls
 
शनाकाच्या या कामगिरीमुळे सीपीएलमधील यापूर्वीचा विक्रम मागे पडला. २०१८ मध्ये आंद्रे रसेलने ४० चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. टिम सेफर्ट आणि शिमरॉन हेटमायर यांनीही ४० चेंडूत शतक करण्याची कामगिरी केली होती. मात्र, शनाकाने या तिघांनाही मागे टाकत ३९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.शतकानंतरही शनाकाची आक्रमकता कायम राहिली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ४३ चेंडूंमध्ये १२१ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि तब्बल १२ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट २८१.४० इतका होता. शनाकाच्या या तुफानी खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने २० षटकांत ४ गडी गमावून २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट लुसिया किंग्सचा डाव पूर्णपणे कोलमडला. संपूर्ण संघ ९८ धावांवर बाद झाला. परिणामी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने तब्बल १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शनाकाच्या विक्रमी शतकामुळे त्याची खेळी या सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरली.