मानोरा,
gokul ashtami शहरातील स्व. प्रतीक ठाकरे प्राथमिक इंग्रजी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गोविंदा बनून पुस्तकांची दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फोडली. ज्ञान हेच खरे धन आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव ठाकरे, सचिव निलेश ठाकरे, मुख्याध्यापक पंकज चव्हाण यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. या अनोख्या दहीहंडी सोहळ्याला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून राधा-कृष्णाचे रूप धारण केले होते. दहीहंडीमध्ये दह्याऐवजी विविध ज्ञानवर्धक पुस्तके ठेवण्यात आली होती. मानवी मनोरे रचून विद्यार्थ्यांनी ही पुस्तकांची दहीहंडी फोडताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.