नवी दिल्ली,
swatantra bhardwaj निशू आझादचे वडील संजय कुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या स्वतंत्र भारद्वाज यांच्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून पोलिसांनी भारद्वाज यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बुलंदशहरमधील चोला पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, तेथे त्यांची चौकशी केली जात आहे.एका पॉडकास्टदरम्यान भारद्वाज यांनी संजय कुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला होता. या पॉडकास्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. कॉकरोच जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्याशी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांनी भारद्वाज यांच्यावर कारवाईची मागणी केली.

सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे विनोद जाखर तसेच नगीना पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात पोहोचले. या सर्वांनी भारद्वाज यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर नेत्यांची दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत सुमारे दोन तास चर्चा झाली.चर्चेनंतर आरोपीविरोधात अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. तसेच संजय कुमार यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय अहवालाच्या आधारे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुढील ७२ तासांत भारद्वाज यांना अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपक यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर भारद्वाज यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून, ७२ तासांत अटक केली जाईल, असे सांगितल्याचे म्हटले. पोलिसांसमोर घडलेल्या द्वेषपूर्ण गुन्ह्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी दोन महिने आणि एका आंदोलनाची गरज पडल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पोलीस विभागात सुधारणा करण्याची मागणी केली.सौरव दास यांनीही पोलिसांना आज संध्याकाळपर्यंत कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. पोलिसांनी योग्य पाऊल उचलले नाही, तर संध्याकाळी पुन्हा पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.