बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
श्रीनगर,
Terrorist eliminated in Budgam जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. अशदर गल्ली परिसरात शुक्रवारी करण्यात आलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस तसेच श्रीनगर सीआरपीएफने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू केली होती.शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. जवानांनी संबंधितांना आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. घटनास्थळावरून एक एके रायफल आणि इतर लढाऊ साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात सुरक्षा दलांची कारवाई अद्याप सुरू आहे.
 
 

badgam 
 
यापूर्वी बडगाम जिल्ह्यातील युसमार्गच्या उंच भागातही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. घनदाट जंगलाच्या परिसरात काही काळ गोळीबार झाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते. परिस्थिती लक्षात घेऊन या भागात अतिरिक्त सुरक्षा कुमकही तैनात करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि श्रीनगर सीआरपीएफने २६ ऑगस्ट रोजी कुलगामच्या बुगाम येथेही संयुक्त शोधमोहीम राबवली होती. या कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४ मिमी पिस्तूल, चार पिस्तूल मॅगझिन, दोन हँड ग्रेनेड आणि दारुगोळ्यासह युद्धसामग्री जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेले साहित्य पुढील तपासासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडे सोपवण्यात आले.