काठमांडू,
Two people emerged tunnel after nine days नेपाळमधील त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांची तब्बल नऊ दिवसांनी सुटका करण्यात आली. यातील ३० वर्षीय संजय साह यांनी या काळात आपला धीर कायम ठेवण्यासाठी ‘हरे कृष्ण’ मंत्राचा जप केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच त्यांना बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. संजय साह हे मधेश प्रांतातील सप्तरी जिल्ह्यातील रहिवासी असून नेपाळ विद्युत प्राधिकरणात कर्मचारी आहेत. प्रकल्पावर ते फोरमन म्हणून कार्यरत होते. बोगद्यात अडकल्यानंतर गेल्या नऊ दिवसांपासून आपण सातत्याने ‘हरे कृष्ण’ मंत्राचा जप करत होतो, असे त्यांनी सुटकेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले. बाहेर पडताच त्यांनी आपला अनुभव सांगताना, नऊ दिवसांपासून हरे कृष्ण मंत्राचा जप करत असल्याचे स्पष्ट केले.

अपघाताच्या वेळी साह नियंत्रण कक्षात काम करत होते. दुर्घटना घडल्यानंतर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. मात्र, सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचे मानून ते मागेच थांबले. इतर लोक बाहेर निघून गेल्यानंतर आपल्यासाठीही बाहेर पडण्याची वेळ निघून गेली होती, असे त्यांनी सांगितले. बोगद्यात अजून किती जण अडकले असतील, याबाबतही साह यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जवळपासच्या तीन-चार जणांशी त्यांचा संवाद झाला होता किंवा त्यांचे आवाज ऐकू आले होते. मात्र, वीज केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसह आणखी काही जण बोगद्यात अडकले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. बोगदा खूप लांब असल्याने प्रत्येक व्यक्ती बाहेर पडली असेलच असे नाही, असेही त्यांनी सांगितले.
पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बोगद्यात अडकलेले लोक पाण्याच्या प्रवाहामुळे आणखी आतल्या भागात ढकलले गेले असण्याची शक्यताही साह यांनी व्यक्त केली. दरम्यान, नेपाळ लष्कराच्या नेतृत्वाखाली सुरक्षा पथकांकडून विशेष उपकरणांच्या मदतीने बोगद्यात शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. सुटका झाल्यानंतर संजय साह यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. त्यांना कोणतीही आरोग्यविषयक समस्या नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून पुढील तपासणीसाठी त्यांना त्रिशुली येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय साह यांच्यासोबत ४५ वर्षीय कबीर महर्जन यांचीही बोगद्यातून सुटका करण्यात आली. मात्र, त्यांच्या प्रकृतीशी संबंधित समस्यांमुळे पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना विमानाने काठमांडू येथील छावणी परिसरातील नेपाळ लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले.