हवाना,
US against Cuba क्युबाच्या आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेने आणखी दबाव वाढवला आहे. अमेरिकेने गुरुवारी क्युबाशी संबंधित काही व्यक्ती आणि कंपन्यांवर नवीन निर्बंध जाहीर केले. यामध्ये क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांचे नातू फिदेल अर्नेस्टो कॅस्ट्रो यांच्यासह क्युबाच्या तेल उद्योगाला आवश्यक साहित्य पुरवणारी आयात कंपनी ABAPET यांचा समावेश आहे. ABAPET क्युबातील डळमळीत झालेली वीज व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी लागणारी विशेष उपकरणे आणि सुटे भाग आयात करते. निर्बंध तज्ज्ञ आणि ‘ऑब्सिडियन रिस्क ॲडव्हायझर्स’चे व्यवस्थापकीय भागीदार ब्रेट एरिक्सन यांच्या मते, या कारवाईमागे क्युबातील महत्त्वाच्या यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या देखभालीवर परिणाम घडवून आणणे तसेच देशातील ऊर्जा संकट अधिक तीव्र करणे हा उद्देश आहे.

अमेरिका क्युबावर शक्य तितका दबाव निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे एरिक्सन यांनी सांगितले. त्यांच्या मते, क्युबाचे सरकार निर्बंधांना चुकवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. मात्र, अशा माध्यमातून देखभालीची उपकरणे मिळवणे अधिक खर्चिक ठरू शकते. त्याचा परिणाम महागाई वाढण्यासोबतच क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडण्यात होऊ शकतो.अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या कारवाईचे समर्थन केले. निर्बंधांच्या कक्षेत आणलेल्या व्यक्ती आणि संस्था या कॅस्ट्रो यांच्या भ्रष्ट आर्थिक आणि गुप्तचर नेटवर्कशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला. क्युबा स्वतंत्र होईपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही रुबियो यांनी म्हटले. क्युबातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना उपपंतप्रधान आणि परकीय गुंतवणूक मंत्री ऑस्कर पेरेझ-ओलिवा फ्रागा यांनी अमेरिकन सरकारला जबाबदार धरले. मेक्सिकोतील क्युबाचे राजदूत युजेनियो मार्टिनेझ एनरिकेझ यांनीही अमेरिकेच्या नव्या निर्बंधांचा निषेध केला. याआधी मे महिन्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाला ‘अयशस्वी देश’ संबोधत, तिथे तेल नसल्याचे म्हटले होते. तसेच क्युबातील नागरिकांना मदत करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.