वनार्टीविरोधात पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर, 
vjnt-phd-fellowship-protestविमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत संशोधक विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था विरोधात समाज कल्याण कार्यालया, नागपूर च्या बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. निधीअभावी वनार्टीने पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व संशोधनाचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
 
 
महाज्योती संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५ करिता पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या एकूण १०० जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी ३५ जागा VJNT प्रवर्गासाठी राखीव होत्या. मात्र, वनार्टीची स्थापना २३ जानेवारी २०२६ रोजी झाल्याने २०२४ व २०२५ या कालावधीसाठी महाज्योतीमार्फत VJNT विद्यार्थ्यांना अर्जाची संधी उपलब्ध होती, असा दावा वनार्टीने शासनाला सादर केलेल्या अहवालात केला आहे.
 

protest 
 
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वनार्टीला ५५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून विविध प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. तर २०२६-२७ साठी ५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निधीची मर्यादा असल्याने पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
 
 
विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागण्या व निवेदने प्राप्त झाल्यानंतर वनार्टीच्या संचालक मंडळाच्या २५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या बैठकीत ठराव क्रमांक २६ अन्वये पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या १७ अतिरिक्त जागांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या निर्णयापूर्वीच जाहिरात निघाली असती तर अनेक संशोधक विद्यार्थ्यांना वेळेत अधिछात्रवृत्ती मिळण्याची संधी उपलब्ध झाली असती.
 
 
अधिछात्रवृत्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे आणि VJNT संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.