वर्धा,
wardha news बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ६७ महिन्यांची वेतनथकबाकी असल्याने माजी आमदार सुरेश देशमुख तसेच संस्थाध्यक्ष समीर देशमुख यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केले. प्रकरण पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे गेल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तोडगा काढण्या सुचना केल्या. काल जिल्हाधिकाऱ्यांपुढे झालेल्या बैठकीत ६७ महिन्यांपैकी फक्त महिन्याचे वेतन देण्याचे संस्थेच्या व्यवस्थापनाने मान्य केले.
सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालाय घडघाईस असल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतनाचा वाद गेल्या अनेक वर्षांपासुन सुरू आहे. प्रकरण न्यायालयातही गेले. व्यवस्थापनाने वेतन देण्याचे न्यायालयापुढे मान्य केले. परंतु, कर्मचारी आजही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. वेतन मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च, आजारपण, औषधोपचार, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजांचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. २०२३ मध्ये तब्बल दहा महिन्यांच्या आंदोलनानंतर ६ महिन्यांचे वेतन आणि नियमित ६० टक्के वेतन देण्याचे आश्वासन मिळाले होते.
मात्र, आश्वासनाची अपेक्षित अंमलबजावणी न झाल्याने प्रश्न कायम राहिला आणि थकबाकीचा आकडा वाढत जाऊन ६७ महिन्यांवर पोहोचला. दरम्यान, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १३ ऑगस्टपासून संस्था अध्यक्ष समीर देशमुख यांच्या निवासस्थानापुढे किमान एक महिन्याचे वेतन द्या या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर मांडली. त्यांनी परिस्थिती गांभीर्याने ऐकून घेत तंत्रशिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. कर्मचार्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापनाला तत्काळ एक पगार देण्याचे आणि त्यानंतर पुढील पगार करण्याचे निर्देश देण्यात आले. पोळ्यापुर्वी हे वेतन प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी आशा आंदोलक कर्मचार्यांनी व्यक्त केली.