वरोडा,
dance icon of nagpur वरोड्याच्या अवघ्या 13 वर्षीय आरोही कमलाकर डुकरे हिने आपल्या प्रतिभेची झेप थेट नागपूरच्या व्यासपीठापर्यंत नेली आहे. नृत्यकलेतील सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये पुरस्कारांची कमाई करणार्या आरोहीची प्रतिष्ठित ‘डान्स आयकॉन ऑफ नागपूर’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी 29 ऑगस्टला निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे वरोड्याच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

नागपूर येथे सखी सहेली फाउंडेशन आणि विश्वविद्या बहुउद्देशीय जनकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द किंग अँड क्वीन ऑफ श्रावण - सीझन 2’ या भव्य कार्यक्रमात आरोहीच्या निवडीची घोषणा करण्यात आली. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या आरोहीने आईचे बोट धरून या कलेची पहिली ओळख करून घेतली. पुढे हीच आवड तिच्या ध्येयात बदलली आणि नियमित सराव, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर तिने नृत्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आरोहीने विविध नृत्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. प्रत्येक सादरीकरणातून तिच्या नृत्यावरील प्रेमासोबतच तिची मेहनत आणि आत्मविश्वास दिसून येतो. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत ‘डान्स आयकॉन ऑफ नागपूर’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदाची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली आहे. नृत्य क्षेत्रात अल्पावधीत मिळविलेली ही मोठी संधी तिच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.