नवी दिल्ली,
water sharing between India and Pakistan भारताने सिंधू पाणी करार निलंबित केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील जलवाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील जलतज्ज्ञ रशीद अब्बासी यांनी भारताच्या चिनाब नदीवरील धरण प्रकल्पांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारताकडून चार मोठी धरणे उभारली जात असल्याचा दावा करत, ही धरणे पाकिस्तानसाठी अत्यंत गंभीर परिणाम घडवू शकतात, असे अब्बासी यांनी म्हटले आहे. एका टीव्ही चर्चेदरम्यान अब्बासी यांनी भारताच्या जलविद्युत प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांच्या मते, बागलीहार धरणाची क्षमता ४५० मेगावॅट आहे, तर पाकल डुल प्रकल्पाची क्षमता १००० मेगावॅट असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राटेल धरणाची क्षमता ८५० मेगावॅट असून किश्तवार धरणाचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानच्या पंजाबमधील शेतीवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
अब्बासी यांच्या दाव्यानुसार, पाण्याच्या प्रवाहात बदल झाल्यास पाकिस्तानातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यांनी या संभाव्य नुकसानीचा अंदाज दरवर्षी २ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी नसल्याचे सांगितले. तसेच प्रताप आणि रणबीर कालव्यांमधून १० लाख ते १५ लाख एकर-फूट पाणी वळवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. भारताच्या या प्रकल्पांविरोधात कारवाई करण्यासाठी आपण एका आठवड्याची प्रतीक्षा करणार असल्याचे अब्बासी यांनी म्हटले. त्यानंतर वैयक्तिक क्षमतेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात जाण्याची धमकी त्यांनी दिली. एखाद्या देशाला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने धरणांमध्ये फेरफार करणे स्वीकारार्ह नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानी जलतज्ज्ञाने पुढे सांगितले की, परिस्थितीवर वेळीच सक्रिय पावले उचलली नाहीत तर पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. हा संघर्ष लष्करी ताकदीपेक्षा बुद्धी आणि रणनीतीचा असल्याचे सांगताना त्यांनी रणगाडे, ड्रोन किंवा विमानांचा अशा परिस्थितीत उपयोग होणार नसल्याचे म्हटले. भारताच्या प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांपासून पाकिस्तानला वाचवण्यासाठी देशाकडे किती शक्ती आणि बुद्धिमत्ता आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.