फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांच्या आहारात अॅव्होकॅडोचे प्रमाण सध्या वाढले आहे. क्रीमी पोत आणि चव यामुळे नाश्ता तसेच सॅलडमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, केवळ चव आणि पोत यामुळेच अॅव्होकॅडोला ‘पोषक तत्वांचा खजिना’ किंवा ‘सुपरफूड’ म्हटले जात नाही. या फळामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्त्वे आढळतात आणि त्यांचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो.
इतर अनेक फळांच्या तुलनेत अॅव्होकॅडोचे पोषणमूल्य वेगळे आहे. बहुतांश फळांमध्ये कर्बोदके किंवा नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते, तर अॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामध्ये अंदाजे २० प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि भरपूर फायबर ही त्यातील प्रमुख पोषक तत्त्वे आहेत. याशिवाय अॅव्होकॅडो पोटॅशियमचाही चांगला स्रोत आहे.
अॅव्होकॅडोमध्ये ओलिक ॲसिड हे मोनोअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड आढळते. हा घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ करण्यास मदत होते. त्यामुळे अॅव्होकॅडोच्या नियमित सेवनामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातासारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.अॅव्होकॅडोमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असल्याने ते खाल्ल्यामुळे वजन वाढते, असा समज अनेकांच्या मनात असतो. याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. या फळात विद्राव्य आणि अविद्राव्य अशा दोन्ही प्रकारच्या फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अॅव्होकॅडो खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी वारंवार किंवा गरजेपेक्षा जास्त खाणे टाळण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होऊ शकते.डोळ्यांच्या आरोग्यासाठीही अॅव्होकॅडो उपयुक्त मानले जाते. यामध्ये ल्युटीन आणि झियाझॅन्थिन यांसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मोतीबिंदू तसेच वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे विविध पोषक घटकांनी समृद्ध असलेले अॅव्होकॅडो आरोग्यदायी आहारातील महत्त्वाचे फळ मानले जाते.