बुमराह खेळणार की बाहेर?

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Will Bumrah play or sit out अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या चार खेळाडूंच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्यांना सेंटर ऑफ एक्सलन्सकडून अद्याप फिटनेस मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मालिकेपूर्वी या चौघांची सिम्युलेशन चाचणी घेतली जाणार आहे. वृत्तानुसार, बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांची या आठवड्यात सिम्युलेशन टेस्ट होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. वैद्यकीय पथकाने गेल्या आठवड्यात निवड समितीला अहवाल दिला असून चौघेही तंदुरुस्त असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सराव सामन्यांच्या माध्यमातून त्यांच्या फिटनेसची अंतिम चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया ४ ते ९ सप्टेंबरदरम्यान पार पडणार असून सर्व खेळाडू अफगाणिस्तान मालिकेसाठी उपलब्ध होतील, असा सेंटर ऑफ एक्सलन्सला विश्वास आहे.
 
bumra
 
 
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या फिटनेस मूल्यांकनावर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील काही मालिकांमध्ये दुखापतीतून पूर्णपणे सावरले नसलेल्या खेळाडूंचा संघात समावेश झाल्याचे दिसून आले होते. हर्षित राणाच्या फिटनेसचे प्रकरणही याच कारणामुळे चर्चेत आले होते. त्यामुळे यावेळी चारही खेळाडूंच्या सिम्युलेशन टेस्टकडे विशेष लक्ष आहे.जसप्रीत बुमराहसाठी ही मालिका महत्त्वाची असून तो १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारतीय संघातही आहे. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी सुवर्णपदक जिंकले होते. यंदाही त्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. मात्र, बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर निवड समिती त्याच्या पर्यायासाठी प्रिन्स यादवचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर तिसरा आणि अंतिम सामना १७ सप्टेंबरला होईल. तिन्ही सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असून तिलक वर्मा उपकर्णधार आहे. संघात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. मात्र, बुमराहसह चार खेळाडूंच्या फिटनेस मंजुरीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.