कीव,
zelenskyy thanks india भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या युक्रेन दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या चर्चेत रशिया-युक्रेन युद्ध, शांतता प्रक्रिया, काळ्या समुद्रातील सुरक्षा आणि अन्नपुरवठ्यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. युद्धाच्या काळात भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल झेलेन्स्की यांनी भारताचे आभार मानले. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी भारताच्या दृढनिश्चयाचे ते कौतुक करतात.

त्यांच्या मते, सध्याची परिस्थिती युद्ध सुरू ठेवण्याची नसून शांततेच्या दिशेने वाटचाल करण्याची आहे. विशेष म्हणजे, जयशंकर कीवमध्ये असतानाच रशियाकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. हे ड्रोन इराणच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनच्या लढाऊ हवाई दलाने बहुतांश ड्रोन पाडल्यामुळे भारतीय शिष्टमंडळाची सुरक्षा सुनिश्चित झाल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी काळ्या समुद्रातील परिस्थितीवरही चर्चा केली. या भागातून प्रवास करणाऱ्या नागरी जहाजांसमोरील धोके आणि सागरी मार्गांवर अवलंबून असलेल्या लोकांच्या अन्नपुरवठ्याचा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. अन्नपुरवठ्याचे मार्ग रोखणे स्वीकारार्ह नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले. रशियाकडून युक्रेनची बंदरे, अन्नमार्ग आणि पुरवठा व्यवस्थेला अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या परिस्थितीत सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जयशंकर यांनी कीवमध्ये युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. भारताने सुरुवातीपासूनच युद्ध हा कोणत्याही समस्येवरील मार्ग नसल्याचे सांगितले असून रणांगणावरून संघर्षाचा तोडगा निघू शकत नाही, असे जयशंकर यांनी म्हटले.
युद्धाचा प्रत्येक दिवस अधिक मृत्यू आणि विध्वंस घेऊन येतो, त्यामुळे संबंधित पक्षांनी चर्चेतून तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडून शांततेसाठी कोणत्याही प्रकारची मदत अपेक्षित असल्यास ती करण्याची तयारी असल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. याआधी एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली होती. त्यावेळी मोदी यांनी पुतिन यांच्यासमोर युद्ध थांबवून शांततेच्या दिशेने पुढे जाण्याची भूमिका मांडली होती. आता जयशंकर यांच्या युक्रेन दौऱ्यातही भारताने युद्धाऐवजी शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर भर दिला आहे.