अर्जुनी मोरगाव,
8 year old boy dies तालुक्यातील निलज येथे मासोळ्या पकडण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या जयेश भुमेश्वर चौधरी (८ वर्षे) या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गावातील कान्हाबोळी तलावात शनिवारी ५ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे निलज गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा आपल्या मित्रांसोबत घराबाहेर फिरण्यासाठी व मासोळ्या पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, घराशेजारी असलेल्या कान्हाबोळी तलावातील पाणीसाठ्याच्या परिसरात मासोळ्या पकडत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.

पाण्याची खोली अधिक असल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जयेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत जयेश हा इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत होता. अल्पवयीन बालकाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली असून, जयेशच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे निलज परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.