वर्धेच्या दारूबंदीसाठी एक तुकाराम व्हावा!

शाळेच्या दारावर अन् मंदिराच्या रस्त्यावरही

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
wardha वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी आता फक्त कागदांवरच राहिलेली आहे. दारूबंदीचे कवित्व करण्यातही अर्थ नाही एवढा चोथा झालेला आहे. शासन आणि प्रशासन दारूबंदीवर पुर्णपणे अपयशी आहे. राजकीय दृष्ट्या सोयीस्कर असलेला पोलिस अधिकारी दारूबंदी म्हटले की गलंगगात्र होतो. आता तर वर्धेतील एका शाळेच्या दारावर आणि अष्टभूजा मंदिराच्या मार्गावरही दारू मिळू लागली आहे.
 
wardha
 
वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय १९७४ मध्ये घेण्यात आला. प्रत्यक्षात दारूबंदी ३० एप्रिल १९७५ ला लागू झाली. काही वर्षे बंदीचा असर कायम होता. त्यानंतर मात्र हळूहळू दारूचा कुटीर उद्योग सुरू व्हायला सुरुवात झाली. आज दारू सुरू असलेल्या जिल्ह्यात जी दारू सहज मिळू शकत नाही ती दारू वर्धा जिल्ह्यात सहज उपलब्ध होते. अगदी ब्लीकिट सारख्या अतिशिघ्र सेवा देणार्यांपेक्षाही कमी वेळा ज्या ब्रॅण्डची दारू मागाल ती तुम्हाला पाहिजे तिथे उपलब्ध होते. त्यामुळे दारूविक्रीवर नियंत्रण कोणाचे आणि दारूबंदी नेमकी कोणासाठी आहे असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. विशेष म्हणजे आर्वी नाका परिसरातील एक शाळा संपली की सायंकाळी त्याच शाळेच्या प्रवेशद्वारावर दारूचा गुत्ता लागतो.
 
 
अष्टभूजा मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर रात्री ९ नंतर दारूड्यांची रांग लागलेली असते. एका पानठेल्यावर येथे दारू कायम उपलब्ध होते. शाळा, मंदिरं किंवा स्वावलंबी मैदानासारख्या अन्य मैदान परिसरांच्या आसपास दारू मिळत असेल तर दारूबंदी कायद्याची भीती कोणाला आहे हा प्रश्न उपस्थित होतो. दारूबंदी म्हणजे केवळ शासनाचा कायदावरचा निर्णय नव्हे तर तिची अमलबजावणी करण्याची ‘राजकीय इच्छाशक्ती’ आणि ‘प्रशासनाची कार्यक्षमता’ महत्त्वाची ठरते. अधूनमधून कायवाई होऊन पुन्हा त्याच दिवसी त्याच जागेवर दारूविक्री होत असेल तर त्या कारवाईचा फायदा काय? वर्धेला आता राजकीय सोयीच्या गणितापेक्षा कायद्याला आणि आपल्या पदाला न्याय देणारा पोलिस अधीक्षक हवा आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी अविनाश कुमार यांनी दारूविक्रेत्यांना सळो की पळो करून टाकले होते. त्यानंतर आजपर्यंत दारूबंदी हा विषय शेवटपर्यंत अजेंड्यांवर घेऊन काम करणारा अधिकारी आला नाही. नियुक्तीनंतर महिना दोन महिने असलेला जोश हळूहळू बाटलीबंद होतो. दोष दारू पिणार्यांचा नाही तर दारू कुठून येते. आणणार्यांची हिम्मत अशी होते याचाही शोध घेणारा अधिकारी वर्धेला हवा आहे. येथे रोज दारू पकडल्या जाते. लगेच ती सुरू होते. दारूबंदीच्या नावावर शासनाचा महसूल बुडतो हा भागही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग जागृत करून टाकला आहे. ती धग निर्माण करणारा अधिकारी आता वर्धेला हवा आहे.
 
कारल्यात बार
वर्धा शहरात अनेक ठिकाणी दारू मिळते आणि ते पोलिसांनाही चांगले ठाऊक आहे. कारला गावात गेल्या काही महिन्यांपासुन एक बार तयार झालेला आहे. या बारच्या त्रासाने शेजार्यांनी घरं विकायला काढले आहेत. दारूच्या आलिशान बारपुढे एक महिला बसुन असते. कारला परिसरात नागपूर रोडकडे जाताना दूध, दह्याची साथ भरावी तसी दारूची साथ भरते. पोलिसांचा डोळा मात्र त्या ठिकाणावर पडला नाही.