संयुक्त राष्ट्र,
Africa won battle of map जगाच्या नकाशात आफ्रिका प्रत्यक्ष आकारापेक्षा लहान दाखवली जात असल्याच्या दीर्घकाळच्या आक्षेपानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. शुक्रवारी झालेल्या मतदानात १६४ देशांनी टोगोने मांडलेल्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर केवळ अमेरिकेने त्याला विरोध केला. सर्बिया, एस्टोनिया, जॉर्जिया, लिथुआनिया, मोल्दोव्हा आणि युक्रेन या सहा देशांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले. आफ्रिकन युनियनच्या सदस्य देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.संयुक्त राष्ट्रांनी सरकारे आणि विविध संस्थांना १६व्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर प्रक्षेपणाऐवजी 'इक्वल अर्थ' नकाशाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. मर्कॅटर नकाशामुळे पृथ्वीवरील प्रदेशांचा आकार त्यांच्या प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा वेगळा दिसतो. विशेषतः ध्रुवांच्या जवळ असलेले भाग मोठे भासतात, तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांसारखे प्रदेश तुलनेने लहान दिसतात. नव्या 'इक्वल अर्थ' प्रक्षेपणामध्ये खंडांचे क्षेत्रफळ त्यांच्या वास्तविक प्रमाणाच्या अधिक जवळ दाखवले जाते.
या फरकाचे सर्वात स्पष्ट उदाहरण आफ्रिका आणि ग्रीनलँडचे आहे. पारंपरिक मर्कॅटर नकाशावर हे दोन्ही प्रदेश जवळपास समान आकाराचे दिसतात. मात्र प्रत्यक्ष क्षेत्रफळाचा विचार केला तर आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा सुमारे १४ पट मोठी आहे. त्यामुळे 'इक्वल अर्थ' नकाशामुळे जगातील विविध प्रदेशांचा वास्तविक आकार अधिक अचूकपणे समजण्यास मदत होईल, असा या मोहिमेतील भूगोलशास्त्रज्ञ आणि संघटनांचा दावा आहे.ठरावाच्या मतदानापूर्वी टोगोचे परराष्ट्र मंत्री रॉबर्ट डुसी यांनी नकाशांचा लोकांच्या विचारसरणीवर होणारा परिणाम अधोरेखित केला. त्यांच्या मते, नकाशे केवळ भौगोलिक माहिती दाखवत नाहीत, तर शिक्षण, कल्पनाशक्ती आणि जगाकडे पाहण्याच्या सामूहिक दृष्टिकोनावरही प्रभाव टाकतात. टोगोनेच हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला आणि आफ्रिकन युनियनमधील अनेक देशांनी त्याला समर्थन दिले.
या निर्णयावर फ्रान्सकडूनही प्रतिक्रिया आली. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोइस यांनी 'एक्स'वर म्हटले की, नकाशा बदलल्यामुळे जग बदलणार नसले तरी जगाचे चुकीचे चित्रण सुधारणे हे सत्याच्या दिशेने एक पाऊल आहे. दरम्यान, मर्कॅटर प्रक्षेपण फ्लेमिश नकाशाकार गेरार्डस मर्केटर यांनी विकसित केले होते. समुद्रातील दिशादर्शनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. मात्र पृथ्वीच्या गोलाकार पृष्ठभागाला सपाट स्वरूपात दाखवल्यामुळे त्यात वेगवेगळ्या प्रदेशांच्या आकारात विकृती निर्माण होते. संयुक्त राष्ट्रांनी मात्र या ठरावामुळे मर्कॅटर नकाशावर कोणतीही बंदी घातलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 'इक्वल अर्थ' नकाशाचा वापर सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आलेला नाही. विविध गरजांनुसार वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे वापरण्याची मुभा कायम राहणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा मुख्य उद्देश सरकारे आणि संस्थांना पृथ्वीवरील प्रदेशांचे क्षेत्रफळ अधिक वास्तववादी पद्धतीने दाखवणाऱ्या 'इक्वल अर्थ' प्रक्षेपणाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. आफ्रिकेचा वास्तविक आकार जगासमोर आणण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे.