गांजा पिऊन विमान उडवत होता पायलट

टर्ब्युलन्सनंतर धक्कादायक खुलासा

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
air india pilot फुकेट-दिल्ली मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाच्या मुख्य वैमानिकाने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत एअर इंडियाने संबंधित वैमानिकाची सेवा तत्काळ समाप्त केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, फुकेट-दिल्ली विमानाच्या पायलट-इन-कमांडच्या तपासणीत एक सायकोॲक्टिव्ह पदार्थ आढळून आला. सुरक्षा, वैद्यकीयदृष्ट्या उड्डाणासाठी सक्षम असणे आणि नियमांचे उल्लंघन या बाबतीत एअर इंडियाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असून, त्यानुसार वैमानिकाची नोकरी तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आली आहे.
 
 
 फुकेट-दिल्ली मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाच्या मुख्य वैमानिकाने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे तपासणीत
फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI 2379 या विमानाचे संचालन एअरबस A320-251N या विमानाद्वारे करण्यात आले होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-EXO होता. विमानात दोन वैमानिक आणि सहा क्रू सदस्यांसह एकूण १४५ जण प्रवास करत होते. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर २४ जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली होती. यापैकी चौघांना गंभीर दुखापती झाल्याचे दहा पानांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विमान दुर्घटना तपास ब्युरो अर्थात AAIB ने याबाबत माहिती देताना मुख्य वैमानिकाच्या तपासणीत सायकोॲक्टिव्ह पदार्थाच्या सेवनाची पुष्टी झाल्याचे सांगितले. ही बाब ‘गंभीर चिंतेचा विषय’ असल्याचेही AAIB ने स्पष्ट केले. प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत मुख्य वैमानिकाचा सायकोॲक्टिव्ह पदार्थाशी संबंधित अहवाल ‘निगेटिव्ह नसल्याचे’ आढळून आले. या सेवनाची पुष्टी गंभीर चिंतेचा विषय असून, AAIB ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) प्राधान्याने योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, फुकेट-दिल्ली विमानाला दिल्लीकडे येत असताना टर्ब्युलन्सचा सामना करावा लागल्याची प्राथमिक माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळावरील आणि विमानातील परिस्थितीशी संबंधित पुरावे तसेच प्रवाशांना झालेल्या दुखापतींचे मूल्यांकन करण्यात आले. या आधारे या घटनेचा अपघात म्हणून समावेश करण्यात आला.
AAIB कडून या प्रकरणाशी संबंधित विविध बाजूंनी मिळालेली माहिती, आकडेवारी आणि उपलब्ध नोंदींची तपासणी सुरू आहे. तपास पथकाने दिल्ली विमानतळावर विमानातील चालक दल तसेच फ्लाइट क्रूच्या सदस्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर विमानातील दोन्ही वैमानिकांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. या तपासातून विमानातील टर्ब्युलन्स, प्रवाशांना झालेल्या दुखापती आणि मुख्य वैमानिकाच्या चाचणीतील निष्कर्ष यांचा सखोल आढावा घेतला जात आहे.