घोटी मार्गावर अपघताची प्रतीक्षा!

जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त: प्रशासनाचे दुर्लक्ष

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
गोरेगाव,
ghoti route गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या जवळच्या घोटी येथील शासकीय अन्नधान्य गोदामाजवळील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसामुळे त्यात पाणी व चिखल साचत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता ‘मृत्यूचा मार्ग’ ठरू पाहत आहे. तेव्हा संबंधित अधिकारी व परिसरातील लोकप्रतिनिधींना या मार्गावर अपघाताची प्रतीक्षा आहे का? असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
 
 
ghoti route
 
तालुका मुख्यालयातच असलेल्या घोटी ते गोरेगाव मुख्य बसस्थानकला जोडणार्‍या या मार्गावर शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अन्नधान्याचे गोदाम असून याच मार्गावर जिल्हा परिषद शाळेसह अंगणवाडी, खासगी शाळा आहे. घोटीवासियांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, वनपरिक्षेत्र कार्यालयासह मुख्य बसस्थानकाकडे ये-जा करण्यासाठी जवळचा व सोयीचा मार्ग असल्याने या मार्गावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, खड्डे चुकविताना वाहनचालकांचा तोल जावून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात पावसामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झाल्याने पादचार्‍यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मोठमोठ्या महामार्गांच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते मात्र निधी व देखभालीअभावी अखेरचा श्वास घेत आहेत. घोटी मार्गाची झालेली दुरवस्था त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.
 
 
विशेष म्हणजे, या मार्गावर शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अन्नधान्य गोदाम असल्याने अन्नधान्य ने-आण करण्यासाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. अन्नधान्याने भरलेले ट्रक या मार्गावरून सातत्याने जात असल्याने संपूर्ण रस्ताच गायब झाला आहे. दरम्यान, गोदामासाठी होणार्‍या अवजड वाहतुकीचा विचार करता संबंधित विभागानेच या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, रस्त्याची गंभीर अवस्था लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिक तहसीलदारांना रस्ता दुरुस्तीबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र, अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
रस्त्याची अवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे. मात्र, अद्याप संबंधित विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
- राजकुमार पटले, ग्रामपंचायत अधिकारी, घोटी