पाटणा,
bihar-floods-ganga-risingबिहारमधील गंगा, पुनपुन, दरधा आणि गंडक यांसारख्या प्रमुख नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाटणा, भोजपूर, बक्सर, बेगुसराय, खगडिया, मुंगेर आणि भागलपूरमध्ये अनेक ठिकाणी गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. पुराचे पाणी १८ जिल्ह्यांमध्ये पसरले असून, ६.६५ लाखांहून अधिक लोकांना त्याचा फटका बसला आहे.
दियारा भागातून मोठ्या संख्येने लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. पुराची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गंगा, गंडक, पुनपुन, दरधा आणि कोसी यांसारख्या अनेक नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे सखल भागांमध्ये पाणी पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी ९ वाजता गांधीघाट गेजवर गंगेची पाणी पातळी ५०.५१ मीटर नोंदवली गेली, जी धोक्याच्या पातळीपेक्षा १.९१ मीटरने जास्त आहे़ गांधीघाट येथे पाण्याची नवीन उच्च पातळी गाठण्याची शक्यता असून विशेषतः दियारा आणि नदीच्या प्रवाहाच्या भागात दाब वाढू शकतो. तसेच श्रीपालपूर येथेही नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे़ पाटण्यातील दिघा घाटावर गंगा भुयारी मार्गाच्या खाली पोहोचली आहे. गायघाट-दिदारगंज रस्ता पाण्याखाली गेला आहे. याशिवाय, बिंद टोली, एलसीटी घाट, गांधी घाट, महावीर घाट आणि पाटणा शहरात अनेक ठिकाणी गंगेचे पाणी शिरल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाटण्यातील संरक्षक भिंतीचे १०८ मार्ग बंद
गंगेचे पाणी शहराच्या सखल भागांपर्यंत पोहोचू नये म्हणून, पाटण्यातील संरक्षक भिंतीमध्ये बांधलेले सर्व १०८ मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आढळलेली कोणतीही गळती थांबवण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. गंगेचे पाणी शहरात शिरू नये म्हणून कुर्जी भागातील नालेही बंद करण्यात आले आहेत. सखल भागात राहणाऱ्या लोकांना गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. तसेच पाटणामध्ये पूरग्रस्तांसाठी चार ठिकाणी मदत शिबिरे चालवली जात आहेत.