अग्रलेख
cultural capital पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहराला विद्येचे माहेरघर किंवा ऑक्सफर्ड ऑफ दि इस्ट असेही म्हणतात. स्वातंत्र्यलढा, राजकारण, समाजसुधारणा, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान अशा अनेकानेक क्षेत्रांत पुण्याचा इतिहास देदीप्यमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षि कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, पु. ल. देशपांडे ते आजच्या काळातील अनेक मान्यवर अशी ही थोर परंपरा. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वंचित वर्गाला द्यावयाच्या प्रतिनिधित्वाविषयी ज्या शहरात शास्त्रार्थ झाला, ते शहर म्हणजे पुणे. टिळक-आगरकरांचा शास्त्रार्थ याच शहरात घडला. त्याच शहरात आता ‘शास्त्रार्था’ऐवजी ‘शस्त्रार्था’चे रंग गहिरे होऊ लागले आहेत. गुन्हेगारी व हिंसाचार वाढतोच आहे; शिवाय छोट्या विषयांवरूनही हिंसा घडू लागली आहे. ताजे उदाहरण उत्सवात डीजे वापरण्यास विरोध करणारे सामान्य नागरिक विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचे. भारतीय समाज बहुरंगी आणि बहुढंगी आहे. एरवी त्याचाच आपण विविधतेतील एकता वगैरे म्हणत ढोल बडवितो. पण, डीजेचा गोंगाट नको म्हणणारे एखादे बापट आपल्याला चालत नाहीत हे नवलच म्हटले पाहिजे.
भारतीय संस्कृतीत मतभेदांना नेहमीच स्थान राहिले आहे. आपली संस्कृती कमालीची सर्वसमावेशक आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणारे, न ठेवणारे हे सारे एकाच ईश्वराचे अंश आहेत आणि त्यामुळे ते सारे आपलेच आहेत, असे मानणारी आपली संस्कृती. चार्वाकाचा भौतिकवाद हा देखील एक विचार आहे, हे मान्य करणारी आपली परंपरा. आपल्या संस्कृतीने चार्वाक किंवा अन्य समांतर विचारधारांना धर्मविरोधी म्हणून नष्ट केले नाही. उलट आपल्यातील एक विचारप्रवाह म्हणून त्यांना आदराचे स्थान दिले. हजारो वर्षांपासून शास्त्रार्थ आणि खंडन-मंडन यांची परंपरा भारतात अक्षुण्ण राहिली. आधुनिक काळात भारतीय समाजाच्या वैचारिक परंपरेचे प्रतिनिधित्व आपली राज्यघटना करते. त्या घटनेतही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे. तीच राज्यघटना कलम २१ प्रमाणे आपल्या सर्वांना प्रतिष्ठित-सुखमय जीवनाचा अधिकार देते. २१ व्या कलमाच्या तरतुदींमध्ये नागरिकांना सन्मानाने व शांतपणे जगण्याचा अधिकार अनुस्यूत आहे. खाजगीपणा (प्रायव्हसी) राखण्याचा अधिकार, स्वच्छ पर्यावरणात आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार, उपजीविकेचा अधिकार असे विविध प्रकारचे अधिकार राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेले आहेत. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता. ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात जगणे हाही शांततेत जगण्याच्या अधिकाराचा भागच होय, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला संपूर्ण भारतासाठी कायद्याचा दर्जा असतो. बापट यांची मागणी किंवा आवाहन त्या कायद्याच्या बाहेरचे नाही. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांच्या व त्या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्यांच्या आकलनात चूक आहे, असे दिसते. खरा प्रश्न इथे डीजेचा नाही. खरा प्रश्न आहे तो इतरांच्या जगण्याच्या अधिकाराचा आदर करण्याचा. मला उत्सव साजरा करण्याचा अधिकार जसा आहे, तसाच दुसऱ्याला शांततेत जगण्याचा अधिकार आहे, हे मान्य करण्याचा हा प्रश्न आहे. माझ्या आनंदाचा आवाज इतरांना त्रासदायक ठरत असेल तर त्या आनंदाला पावित्र्य ऊरत नाही, हे न समजण्याचा हा मुद्दा आहे. भारतीय सणांना आता जे स्वरूप आले आहे, तो काळाचा महिमा असला तरी त्यातले सगळेच चांगले किंवा वाईट असे सरसकट म्हणता येत नाही. व्यापक समाजहितासाठी कोणत्याही गोष्टीत बदल करणे ही आपलीच परंपरा आहे. उत्सव हे भारतीय समाजजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. आनंद व्यक्त करण्यासाठी एकत्र येणे, परंपरा जपणे, देवदेवतांची आराधना करणे, मिरवणुका काढणे, संगीत व नृत्य करणे याला आपल्या संस्कृतीत मोठे स्थान आहे. मात्र, उत्सवाच्या आनंदाचे रुपांतर उन्मादात होत असेल आणि इतरांना त्रास होत असेल तर आपल्या सणांच्या संदर्भातील मूळ विचार मागे पडतात, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
एखाद्याने कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न उपस्थित केला की त्याला उत्तर देण्याऐवजी त्याची टवाळी करणे किंवा त्याला मारहाण करणे हे फक्त एका व्यक्तीच्या अवमानापुरते मर्यादित कृत्य नाही. तो समाजाच्या वैचारिक अधःपतनाचा संकेत आहे. बापट यांनी युक्तिवाद केला. त्यांना युक्तिवादाने उत्तर देता येणे शक्य आहे. त्यांच्या साऱ्याच वक्तव्यांचे समर्थन करता येत नाही. पण, त्यांना झालेल्या मारहाणीचेही समर्थन होऊ शकत नाही. युक्तिवादाला गुद्याने उत्तर द्यावे लागत असेल तर आपण शास्त्रार्थ सोडून शस्त्रार्थाच्या दिशेने निघालो आहोत, असेच म्हणावे लागेल. पुण्याची अस्मिता आणि ओळख विद्या, शास्त्रार्थ आणि पुरुषार्थाशी जोडलेली आहे. मतभेद कसे मांडायचे, विरोध कसा करायचा आणि तर्काच्या आधारे भूमिका कशी सिद्ध करायची, याचे अनेक दाखले पुण्याच्या इतिहासात सापडतात. तो शास्त्रार्थ बाजूला पडून शस्त्रार्थचाच बोलबाला होऊ लागतो तेव्हा साऱ्याच शहरांनी आपल्या इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे. आपले समाज जीवन नेमक्या कोणत्या दिशेने चालले आहे, याचा धांडोळा घेतला पाहिजे. शास्त्रार्थात पराभव झाला तर पुन्हा विचार करता येतो.cultural capital मात्र, शस्त्रार्थात अनिष्ट प्रवृत्तींचा विजय झाला तर समाजाचा पराभव होतो. कारण दहशतीच्या वातावरणात विचार मांडण्याची हिंमतच कमी होत जाते आणि भयमुक्त लोकशाहीच्या पायाला धक्का लागत असतो. आज विद्यानंद बापट आहेत. उद्या दुसरा कोणी असेल. आज प्रश्न डीजेचा आहे, उद्या तो रस्त्यावरील अतिक्रमणाचा असेल, प्रदूषणाचा असेल, वाहतुकीचा असेल किंवा एखाद्या सामाजिक विषयाचा असेल. प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘तू कोण हे बोलणारा?’ असे विचारले जाणार असेल, तर लोकशाहीतील नागरिकत्वाच्या अधिकारांना अर्थच उरणार नाही. भारतीय नागरिकाला प्रश्न विचारण्यासाठी राजकीय पक्षातील पद, संघटनेचे सदस्यत्व किंवा कोणत्याही नेत्याचे पाठबळ लागत नाही. नागरिक असणे एवढीच पात्रता पुरेशी आहे. बापट यांची पात्रता त्यामुळे फक्त नागरिक म्हणून प्रश्नातीत आहे. त्यांच्यासारखा तर्क करता न येणारे लोक युक्तिवादापासून पलायन करीत आहेत आणि हिंसेचा आधार घेत आहेत. विचार चुकीचा असेल तर खोडून काढलाच पाहिजे. तसे न होता फक्त मारहाण करण्याचे समर्थन होऊ शकत नाही. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात मतभेद व्यक्त करण्याच्या संदर्भात असे वातावरण निर्माण होत असेल तर ते योग्य नाही. विद्या केवळ पदवी मिळवून देत नसते. विद्या ही माणसाला असहमतीचा स्वीकार करण्याची ताकद देते. ती माणसाला सहनशील व समंजस बनविते. आपल्याला न पटणारे ऐकून घेणे, स्वतःची भूमिका तपासणे आणि गरज पडल्यास ती बदलणे हीच खरी विद्वत्ता असते. ज्याला प्रत्येक विरोधक शत्रू वाटतो, त्याने कितीही पुस्तके वाचली असली तरी त्याच्यात विद्येचा संस्कार किती उतरला, हा प्रश्न ऊरतोच. त्यामुळेच पुण्याने आणि त्याच्यापाठोपाठ अन्य शहरांनी देखील भारतीय संस्कृतीचा आदर करीत चर्चेची, शास्त्रार्थाची परंपरा पुन्हा जिवंत केली पाहिजे. पुण्याच्या इतिहासात ‘शास्त्रार्थ’ हा शब्द केवळ धार्मिक किंवा तात्त्विक चर्चेपुरता मर्यादित नव्हता. तो व्यापक सार्वजनिक संस्कृतीचा भाग होता. तर्काचा सामना प्रतितर्काने व्हायचा. मतभेदांतून नवे विचार जन्माला यायचे. त्याच परंपरेचे पुनरुज्जीवन आज पुण्याला नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. लोकतांत्रिक समाजाची खरी ताकद सर्वांनी एकसारखा विचार करण्यात नसते. सर्वांनी वेगळे विचार करूनही एकत्र राहण्यात असते. भारत हजारो वर्षे विविध विचार, पंथ, उपासना, तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती यांना सामावून घेत टिकला, याचे कारण मतभेदांचा अभाव नव्हे; तर मतभेदांसह जगण्याची आपली क्षमता हेच होते. आज त्या क्षमतेचीच कसोटी आहे...अर्थात आपल्या सर्वांचीच परीक्षा आहे.