बस्तरमध्ये उलगडलं पृथ्वीच्या आदिकाळाचं रहस्य!

३.६५ अब्ज वर्षे जुना खडक

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
रायपूर.
Earth's early history in Bastar छत्तीसगडच्या नैऋत्य बस्तरमधील घनदाट जंगल परिसरातून भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण शोध समोर आला आहे. या भागात आढळलेल्या खडकाच्या तुकड्याचे वय तब्बल ३.६५ अब्ज वर्षे असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा खडक भारतातील आतापर्यंतचा सर्वात जुना खडक ठरला आहे. या शोधामुळे भारतीय भूभागाच्या प्राचीनतेचा अंदाज सुमारे १५० दशलक्ष वर्षांनी मागे गेला असून, अनेक दशकांपासून प्राचीन खडकांसाठी प्रसिद्ध असलेल्या झारखंडमधील सिंहभूमलाही बस्तरने मागे टाकले आहे.हा शोध 'जिओसायन्स फ्रंटियर्स' या नियतकालिकात प्रकाशित होणाऱ्या अभ्यासाचा भाग आहे. बस्तरमध्ये यापूर्वी झालेल्या संशोधनात येथील खडकांचे वय अंदाजे ३.५६ अब्ज वर्षे असल्याचे मानले जात होते. मात्र, नव्या अभ्यासामुळे पृथ्वीच्या अत्यंत सुरुवातीच्या काळातील भूवैज्ञानिक घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला आहे. हा खडक भोपाळपट्टणम-विजापूर कॉरिडॉरमध्ये आढळला असून, या परिसरात प्राचीन क्रॅटॉनचा भाग आहे. क्रॅटॉन म्हणजे भूखंडाच्या कवचाचा असा अतिप्राचीन भाग, जो दीर्घकाळातील टक्कर, प्रचंड दाब आणि वितळण्याच्या प्रक्रियांनंतरही टिकून राहिला आहे.
 
 
 

Earth 
भोपाळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) चे प्राध्यापक प्रीतम नासिपुरी आणि कौशिक सत्पथी यांनी हा अभ्यास केला. कोरिया बेसिक सायन्स इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक केवुक यी तसेच आयआयटी खरगपूरचे माजी प्राध्यापक अभिजित भट्टाचार्य यांनीही संशोधनात योगदान दिले. अभ्यासादरम्यान या प्रदेशाच्या भूवैज्ञानिक उत्क्रांतीतील तीन महत्त्वाच्या टप्प्यांची नोंद झाली. पहिली घटना सुमारे ३.६५ अब्ज वर्षांपूर्वी, त्यानंतर ३.६४ ते ३.६० अब्ज वर्षांपूर्वी आणि तिसरी पुनर्रचना ३.४४ ते ३.४० अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे समोर आले. संशोधकांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे खडक ओळखले असून, त्यातील सर्वात जुना प्रकार नीस (gneiss) म्हणजेच पट्टेदार खडक आहे.
 
 
 
प्राध्यापक प्रीतम नासिपुरी यांच्या मते, या खडकावरील पट्टे त्याच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या भूवैज्ञानिक प्रवासाची माहिती देतात. पृथ्वीच्या कवचाच्या सुमारे ३० ते ५० किलोमीटर खोल भागात उष्णता आणि अंशतः वितळण्याच्या प्रक्रियेतून या खडकाची निर्मिती झाली. त्या ठिकाणी तापमान १,००० अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. याशिवाय बस्तरमध्ये आढळलेले ३.६४ ते ३.६० अब्ज वर्षे जुने नमुने जगातील सर्वात जुन्या ज्ञात मॅग्मॅटिक चार्नोकाइट्सपैकी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. खडकाच्या रासायनिक आणि समस्थानिक विश्लेषणातून आणखी एक महत्त्वपूर्ण संकेत मिळाला आहे. सुमारे ३.६ अब्ज वर्षांपूर्वीच पृथ्वीवर सबडक्शनशी संबंधित प्रक्रिया सुरू झाल्या असाव्यात, असे या पुराव्यांवरून सूचित होते. आधुनिक प्लेट टेक्टॉनिक्सच्या सुरुवातीच्या स्वरूपाशी या प्रक्रिया संबंधित मानल्या जातात. त्यामुळे बस्तरमधील हा शोध केवळ भारताच्या खडकांच्या वयाबाबत महत्त्वाचा नसून, पृथ्वीच्या सुरुवातीच्या भूशास्त्रीय इतिहासाविषयीच्या विद्यमान समजुतींनाही नवे आव्हान देणारा ठरू शकतो.