कारंजात शेतकर्याने उठवला समस्यांचा ‘बाजार’

कर घेताय पण सुविधा कुठे?

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
कारंजा (घा.),
karanja शहरातील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येणार्या तालुक्यातील शेतकर्यांच्या अडचणी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. कर तर घेताय, पण सुविधा नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तालुक्यातील बिहाडी येथील शेतकरी विलास भांगे यांनी नगरपंचायत प्रशासनाला खडे बोल सुनावले.
 
 
 
पहाटेपासून आठवडी बाजाराच्या दिवशी येणार्या शेतकर्यासाठी साधी पाण्याचीही सोय बाजारात नाही नसल्याने शेतकरी भांगे यांनी आवाज उठवला. तालुक्यातील शेतकरी आपला नाशवंत माल विक्रीसाठी आठवडी बाजारात घेऊन येतो. मात्र, बाजारात पाऊल टाकताच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पहाटे ४ ते ५ वाजता शेतमाल घेऊन यावे लागते. पण, पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही. स्वच्छतागृह इतके घाणेरडे आहेत की तिकडे पाहवल्या सुद्धा जात नाही. अपुर्ण प्रकाश, शेड नसल्याने ऊन-वारा व पावसात शेतमाल ठेवावा लागतो आणि सुरक्षेसाठी एकही सीसी टिव्ही कॅमेरा नाही, असे भांगे यांनी नमूद केले. छोट्या गाडीत भाजीपाला आणला तरी आल्या-आल्या ४० ते ५० रुपये कर म्हणून मागितले जातात. मात्र, याबाबत मार्केट यार्डमध्ये किंवा कुठेही दर्शनी भागात रेट बोर्ड लावलेला नाही. एवढेच नव्हे तर घेतलेल्या पैशांची पावतीही दिल्या जात नसल्याचे भांगे यांचे म्हणणे आहे.
 
वसुली करणार्या कर्मचार्याची वागणूक अतिशय उर्मट आणि एकेरी भाषेत असते. शेतकर्याला अपमानस्पद वागणूक दिल्या असल्याचा आरोप भांगे यांनी केला आहे. बाजारात पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था, स्वच्छतागृहाची स्वच्छता, पुरेसा प्रकाश आणि शेडची व्यवस्था, बाजारात सीसी टिव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून उर्मट प्रतिनिधींना समज देण्यात यावा आदी मागण्याही भांगे यांनी निवेदनातून केल्या आहेत.
 
या संदर्भात नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिर्के यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, भांगे यांची तक्रार आपल्याकडे आलेली आहे. पंचायतकडून संबंधित कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली आहे. त्याच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.