गोंदिया,
modified silencers seized शहर व परिसरात दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर लावून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत गाड्या चालवणार्या हुल्लडबाजांचे प्रमाण वाढले आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत गोंदिया पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखेने शुक्रवारी शहरात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान फटाक्यांसारखा आवाज करणार्या मॉडिफाय सायलेन्सर बसवलेल्या 5 दुचाकी पकडण्यात आल्या असून, या सर्व गाड्या वाहतूक पोलिस ठाण्यात जमा (डिटेन) करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक नागेश भास्कर, श्रेणी पोलिस निरीक्षक श्रावण गेडाम, छत्रपालसिंग चंदेल व वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांनी केली. दरम्यान, नागरिकांनी व वाहनचालकांनी आपल्या गाड्यांना कंपनीचे मूळ सायलेन्सरच वापरावेत. बेकायदेशीर बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर लावू नयेत. यामुळे रुग्ण आणि बालकांना नाहक त्रास होतो. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर यापुढेही वाहने जप्त करण्याची कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.