हिंगणघाट,
vana river येत्या काही दिवसातच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. विसर्जन सोहळाही धुमधडाक्यात साजरा होतो. मूर्तींचे विसर्जन शहराची जीवनदायिनी असलेल्या वणा नदीत होते. परंतु, विसर्जनानंतर वणा नदीचे होणारे प्रदूषण व त्याची साफसफाईची जबाबदारी निश्चित करण्यात यावे या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांना श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले.

गणपती, देवी विसर्जनानंतर नदीत जमा होणार्या मातीमुळे मोठ्या प्रमाणात शेवाळे, लवी तयार होतात. त्यामुळे नदी पुन्हा प्रदूषित होते. त्यावर त्वरित उपाययोजना करणे, विसर्जनाला नदीघाटावर पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असावी, विसर्जन कुंड व्यवस्थित असावे, सार्वजनिक मूर्ती विसर्जनाची जागा निश्चित करावी, लाईटची व्यवस्था करण्यात यावी, निर्माल्य संकलन व्यवस्था, नदी काठावर पुरेशी पार्किंग व्यवस्था, येण्याजाण्याचा रस्ता बाजूला मुरुम टाकुन सुटसुटीत करावा, यासाठी नगर परिषद प्रशासनासह सार्वजनिक मंडळांवर जबाबदारी द्यावी. जेणेकरून त्यांना जबाबदारीची जाणीव होईल व नदी संवर्धनासाठी त्यांचाही हातभार लागेल. यासाठी नपच्या वतीने सर्व सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यासोबतच शक्य असल्यास स्वच्छता शुल्क आकारले जावे. परंतु, वणा नदी ही अविरल धारेसह स्वच्छ असावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
नगराध्यक्ष डॉ. तुळसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी संस्थेचे धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, उमेश डेकाटे, गणेश कुंभारे, सचिन ऐलकुंचेवार, आशिष इरखडे आदी सदस्य उपस्थित होते.