व्यापाराच्या पलीकडे ‘मानवी मूल्यांचा संवाद’ गरजेचा:मुख्यमंत्री

‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’चे मुंबईत उद्घाटन

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
मुंबई,
global-impact-forum-2026जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. त्यामुळे आर्थिक संबंध आणि व्यापारापुरते सहकार्य मर्यादित न ठेवता मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचे राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सध्याची जागतिक व्यवस्था विविध स्तरांवर असंतुलित दिसत आहे. अशा परिस्थितीत विविध देशांमध्ये संवाद वाढवून समान मूल्यांच्या आधारे परस्पर समज निर्माण करण्याची गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्याने जग अधिक चांगले होणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

fadanvis 
 
भारतीय संस्कृतीचा मूलाधार ‘वसुधैव कुटुंबकम्’ असून संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना भारताने जगाला दिली आहे. भारताने व्यापाराबरोबरच विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला. बौद्ध धर्माचा प्रसार हा त्याचे उदाहरण असून तो युद्ध किंवा हिंसेतून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झाला, असे फडणवीस यांनी नमूद केले.
ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी ‘जीआयएफ’ महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास संचालिका जान्हवी पवार यांनी व्यक्त केला. भारत-ब्राझीलच्या सांस्कृतिक साम्यस्थळांचे दर्शन घडविणारे दृकश्राव्य सादरीकरणही यावेळी झाले.