टूरिस्ट बसला आग; धुराचे लोट स्थानकात मार्गावर वाहतूक कोंडी

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
मुंबई
goregaon metro station bus मुंबईतील गोरेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी टूरिस्ट बसला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली एका बसने पेट घेतला. बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने धुराचे लोट थेट मेट्रो स्थानकात शिरले. त्यामुळे स्थानकात उपस्थित प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानकातील नागरिकांना खाली जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले.
 

goregaon metro station bus fire: tourist bus catches fire, smoke enters station, traffic jam on western express highway 
बसला आग लागल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सायंकाळच्या वेळेत या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला. दरम्यान, लाइन ७ए मेट्रोचे संचालन करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मेट्रो स्थानकातील धूर पूर्णपणे बाहेर जाईपर्यंत गोरेगाव स्थानकावर मेट्रो गाड्या थांबवण्यात येत नव्हत्या.
प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर चालक खाली उतरला. त्यानंतर अचानक मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांसह दाट धुराचे लोट वरच्या दिशेने पसरत मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचले. त्यामुळे प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या पश्चिम भागात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्थानकाजवळील एका सिग्नलच्या परिसरात ही आग लागली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा तसेच मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुरुवातीला बसमध्ये प्रवासी होते की ती जवळपास रिकामी होती, याबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती उपलब्ध झाली नव्हती. मात्र, बसला लागलेली आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.