नेपाळच्या पुराचं भयावह वास्तव; ४,८९८ जण बेपत्ता

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
काठमांडू,
horrifying reality of Nepal's floods नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, नेपाळ पोलिसांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १,३४४ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये ४८९ पुरुष, २६९ महिला, ५२ मुले आणि ३३ मुलींचा समावेश आहे. याशिवाय ५०१ मृतदेहांचे अवशेष सापडले असून, त्यांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.या दुर्घटनेनंतर ४,८९८ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये ४,२५० नेपाळी नागरिक आणि ६१८ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता नेपाळी नागरिकांमध्ये २,४४८ पुरुष आणि ४८२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, १,३५० बेपत्ता व्यक्तींविषयीची माहिती पोलिसांना फोनद्वारे मिळाली आहे. बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ८,६३१ लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून, त्यात ७,३८७ नेपाळी आणि १,२४४ परदेशी नागरिक आहेत.
 
 
horrifying reality of Nepal
 
पुरामुळे घरदार गमावलेल्या ३,६५५ नागरिकांना सध्या विविध तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी १,०३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याचे कामही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १,२६० मृत व्यक्ती आणि त्यांच्या ९७२ नातेवाईकांचे, म्हणजेच एकूण २,२३२ व्यक्तींचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय १,२७० अज्ञात व्यक्तींची माहिती एका वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत मदत होण्याची अपेक्षा आहे.
नेपाळ-तिबेट सीमेजवळील लांगटांग लिरुंग प्रदेशात २६ ऑगस्ट रोजी बर्फ-खडक कोसळल्याने किंवा हिमनदी ढासळल्याने ही आपत्ती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर भोटेकोशी, त्रिशुली आणि संबंधित नद्यांना अचानक मोठा पूर आला. या पुराचा सर्वाधिक फटका रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा, चितवन, नवलपरासी यांसह अन्य जिल्ह्यांना बसला. मोठ्या प्रमाणावरील विध्वंस आणि जीवितहानीमुळे या आपत्तीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून, नेपाळच्या मदतीसाठी विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे आले आहेत. दरम्यान, या आपत्तीनंतर नऊ दिवसांनी एका बोगद्यातून जिवंत बाहेर आलेल्या व्यक्तीचा अनुभवही चर्चेत आला होता. जन्माष्टमीच्या दिवशी हरे कृष्ण मंत्राचा जप करत आपण जिवंत राहिलो, असे त्याने सांगितले होते. या घटनेने नेपाळमधील महापुराच्या भीषणतेसोबतच बचावलेल्या नागरिकांच्या संघर्षाकडेही जगाचे लक्ष वेधले.