गडचिरोली,
illegal-trade-crackdownजिल्ह्यात अवैध दारू, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अमली पदार्थांची विक्री व वाहतूक तसेच जुगारासारख्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मागील चार महिन्यांत नियोजनबद्ध धडक मोहीम राबविली. या कारवाईत विविध प्रकारचे तब्बल १ हजार २६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ हजार ५३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ कोटी ९९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवणे तसेच समाजकंटकांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली.
मागील चार महिन्यांच्या कालावधीत अवैध दारूविक्री व वाहतूक प्रकरणी जिल्ह्यात १ हजार १७८ गुन्हे दाखल करीत १ हजार ३३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ४ कोटी ७२ लाखाचा अवैध दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतुकीविरोधातील १७ गुन्ह्यात २८ आरोपींच्या अटकेसह कारवाईत ५३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणांत १३ गुन्हे दाखल असून ८ आरोपींना गजाआड करण्यात आले. या कारवाईत ९६ लाख ४२ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध जुगार खेळणाऱ्यांविरोधात ५४ गुन्ह्यात १६७ आरोपींना अटक करीत १ कोटी ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे अस्त्र उगारण्यात येत असून अशा प्रवृत्तींविरुद्ध भविष्यातही सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारीमुक्त, व्यसनमुक्त आणि सुरक्षित नागरिकांच्या सहकार्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस दल सदैव कटिबद्ध आहे.