तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांचे थांबलेले मानधन लवकरच मिळणार!

आ. भावना गवळी पाटील यांची माहीती

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
वाशीम,
mla bhavana gawali patil पूर्वी तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र असल्यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मानधन आणि इतर लाभ बंद करण्यात आले होते. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधवांनी आ. भावना गवळी पाटील यांच्या जनता दरबाबरात आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आ. गवळी पाटील यांनी दिव्यांग सक्षमिकरण विभागाचे सचिव व वाशीमचे उपजिल्हाधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन अपंगाच्या थांबलेल्या मानधनाबाबत चर्चा केली. तेव्हा तात्पुरते अपंग प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांना तात्काळ मानधन देण्याची मागणी केली. त्यावर संबधित अधिकार्यांनी अपंगाच्या थांबलेल्या मानधनाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
 
 
mla bhavana gawali patil
 
सामाजिक न्याय विभागाकडून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा आता स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या नवीन डिजिटल प्रणालीवर वर्ग केला जात आहे. या तांत्रिक बदलांमुळे अनेक महिने मानधनाची प्रणाली जनरेट होण्यास विलंब झाला. तसेच तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या किंवा ज्यांचे युडीआयडी कार्डची मुदत संपल्यामुळे ब्लॉक झाले होते, अशा लाभार्थ्यांची नावे पडताळणीसाठी तात्पुरती थांबवली गेली होती. परिणामी दिव्यांगाचे मानधन गेल्या काही महीन्यापासून बंद होते. हे बंद झालेले मानधन सुरु करण्यासंदर्भात शिवसेनेचे आ. बच्चु कडु यांनी पाठपुरावा केला. मात्र, तरी देखील ऑगस्ट अखेर पर्यंत वाशीम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे मानधन पुर्वरत सुरु झाले नाही. आ. भावना गवळी पाटील यांनी वाशीम येथे ४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारात दिव्यांग बांधवांनी मानधन बंद असल्यामुळे येत असलेल्या अडीअडचणी मांडल्या.
 
 
यावेळी आ.भावना गवळी पाटील यांनी दिव्यांग सक्षमिकरण विभागाचे सचिव व वाशिमचे उपजिल्हाधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन त्यांना तात्काळ मानधन देण्याचे निर्देश दिले. तेव्हा संबधित अधिकार्‍यांना या संदर्भात तात्पुरते अपंग प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांच्या याद्या तयार करुन मानधन वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगीतले. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील दिव्यांगांच्या संघटनांनी मानधन थांबलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासकिय यंत्रणेकडे लवकरात लवकर सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले.
 
 
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार, जर आपल्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकार्याने दिलेले वैध तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड असेल, तर विशेष सहाय्य योजनांचे लाभ आणि मानधन अडवले जाणार नाही, ते सुरूच राहील. मात्र, जर तुमच्या तात्पुरत्या प्रमाणपत्राची मुदत संपली तर तुमचे मानधन बंद होऊ शकते, अशा वेळी तुम्हाला मुदत संपण्यापूर्वी स्वावलंबन कार्ड पोर्टल वर जाऊन किंवा सरकारी रुग्णालयात प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे.