कोलंबो,
Mahinda Rajapaksa's son arrested श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि विरोधी पक्ष श्रीलंका पोदुजना पेरामुना (SLPP) चे नेते नमाल राजपक्षे यांना कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन एअरलाइन्ससाठी एअरबस विमानांच्या खरेदीशी संबंधित प्रकरणात देशाच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाने (CIABOC) ही कारवाई केली. ४० वर्षीय नमाल राजपक्षे यांना शुक्रवारी आयोगासमोर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पाच तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
अटकेनंतर नमाल राजपक्षे यांना दंडाधिकारी असंगा एस. बोडेरागामा यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर कोलंबोच्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. महिंदा राजपक्षे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात श्रीलंकन एअरलाइन्ससाठी मोठ्या आकाराच्या एअरबस विमानांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातून नमाल राजपक्षे यांना कथितरित्या फायदा झाला आणि त्यासंबंधीचे कमिशन विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याच्या माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी नॅशनल पीपल्स पॉवर सरकार सत्तेवर आल्यानंतर राजपक्षे कुटुंबातील एखाद्या सदस्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. नमाल यांचे चुलत भाऊ शसेंद्र राजपक्षे यांनाही याच वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, नमाल राजपक्षे यांनी १२ सप्टेंबर रोजी उत्तर-मध्य भागातील अनुराधापुरा येथे मोठी सरकारविरोधी रॅली आयोजित करण्याची घोषणा केली होती. ही रॅली आणि सरकारविरोधातील आंदोलन रोखण्यासाठीच नमाल यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप SLPP ने केला आहे. नमाल यांच्या भावंडांवरही गैरव्यवहाराचे आरोप असून, हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीतून केले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. नमाल राजपक्षे यांच्या अटकेच्या आधी २००५ ते २०२३ या काळात राजपक्षे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या जॉन्स्टन फर्नांडो यांच्यावरही CIABOC ने कारवाई केली होती. कॅंडी जिल्ह्यात महिंदा राजपक्षे यांच्या नावाने असलेल्या एका कॉन्फरन्स हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सार्वजनिक निधीचा कथित गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.