लाहोर,
Major changes in the Pakistan team इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक ठरल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघरचनेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना अद्याप बाकी असतानाच पीसीबीने कठोर निर्णय घेतले आहेत. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्सवरील पराभवानंतर पीसीबीने कसोटी संघातील सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि उमर गुल यांनाही इंग्लंडमधून परतण्याचे आदेश देण्यात आले.

या बदलांच्या मालिकेत आता निवड समितीचे प्रमुख आकिब जावेद यांचे पदही धोक्यात आल्याची चर्चा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पीसीबीच्या एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आकिब जावेद यांना लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमधील त्यांच्या जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते. आकिब जावेद हे हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये विकास संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चीफ ऑफ सिलेक्टर्सची जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, रिझवान, इमाम आणि सलमान यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णयही या बदलांचा भाग असल्याचे सूत्राने सांगितले. इमाम आणि रिझवान यांना खराब फॉर्मसोबतच ड्रेसिंग रूममधील त्यांच्या वागणुकीमुळे संघातून वगळण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. कसोटी मालिकेच्या मध्यातून या खेळाडूंना परत पाठवण्याची शिफारस अंतरिम कसोटी मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी केली होती. मर्यादित षटकांच्या शिबिरात काम केलेल्या काही खेळाडूंना आजमावण्याची हेसन यांची इच्छा होती. इंग्लंड दौरा संपल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या निवड समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे.