अंमली पदार्थ तस्करांवर पहिल्यांदाच ‘मोक्का’ कारवाई

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर,
mcoca action शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरविणार्‍या आणि मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय असणार्‍या सराईत टोळीविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणारे आरोपी वसीम खान आरिफखान उर्फ कालू (40), नसीबखान आरिफखान उर्फ मालू (39, रा. दोघेही नुरी चौक, बगड खिडकी, चंद्रपूर), जुबेर करिम खान (रा. बगड खिडकी, चंद्रपूर) व फरार असलेल्या एका अन्य अरोपी विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात कलम 8 (क), 20 (बी) (2) (बी), 29 एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपींविरूध्द अंमली पदार्थ तस्करीसह मारहाणीचे 21 गंभीर गुन्हे दाखल असून, ते पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत.
 
 
mcoca action
 
संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला. संबंधित प्रस्तावाला मंजुरी देत या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) 1999 चे कलम 3 (1) (2), 3 (2) आणि 3 (4) लागू करण्यास त्यांनी परवानगी दिली. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी या सर्व आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके व त्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस अंमलदारांनी पार पाडली आहे.