मुंबई पोलिसांच्या माउंटेड युनिटला बळकटी

७० अश्वारोही खेळाडूंची नवी पदे

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
मुंबई
mumbai police मुंबई पोलिसांची माउंटेड पोलिस युनिट अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृह विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, माउंटेड पोलिस युनिटसाठी ‘अश्वारोही खेळाडू’ संवर्गातील ७० नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही पदे विद्यमान पदांप्रमाणेच वेतनश्रेणीत राहणार आहेत.
 

mumbai police mounted unit gets 70 new equestrian player posts, maharashtra government approves major decision 
शासन निर्णयानुसार, पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर सध्या कार्यरत असलेली ७० पदे सरकारकडे समर्पित करण्यात येणार आहेत. त्याऐवजी समान वेतनश्रेणीत ‘अश्वारोही खेळाडू’ संवर्गातील ७० पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस विभागाच्या एकूण मंजूर पदसंख्येत प्रत्यक्ष वाढ होणार नसून, विद्यमान ७० पदांचेच पुनर्गठन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. माउंटेड पोलिस युनिटसाठी कार्यरत असलेली पदे समर्पित करून त्यांच्या जागी अश्वारोही खेळाडूंची नवीन पदे निर्माण करण्याची मागणी या प्रस्तावातून करण्यात आली होती. ६ जुलै २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर गृह विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला.
माउंटेड पोलिस युनिटसाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. तसेच, शासन निर्णयाच्या परिशिष्टात नमूद केलेल्या ७० पदांव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त पद निर्माण करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय या युनिटसाठी कोणतीही अतिरिक्त आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचेही शासन निर्णयात नमूद आहे.
घोड्यांच्या देखभालीबाबतही शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. घोड्यांचे आरोग्य, खानपान तसेच अस्तबलाची व्यवस्था उपलब्ध संसाधनांमधूनच करावी लागणार आहे.
या निर्णयामुळे मुंबई पोलिसांच्या माउंटेड युनिटमध्ये अश्वारोही खेळाडूंच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे युनिटची कार्यक्षमता आणि संचालन क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माउंटेड पोलिस युनिट ही कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी घोड्यांवरून गस्त घालणारी पोलिसांची विशेष तुकडी आहे. घोडेस्वार पोलिसांकडून या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळली जाते.