आश्रमशाळेतील २४ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
नाशिक
kalwan ashram school नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय सृष्टी ओंकार सूर्यवंशी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. सृष्टीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याच आश्रमशाळेतील २४ विद्यार्थ्यांना ताप, उलटी तसेच व्हायरल संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
 

kalwan ashram school  
सृष्टीला ३ सप्टेंबर रोजी ताप आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी मोकमभणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र, ४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर तिची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली. त्यामुळे तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सृष्टीला मृत घोषित केले.
सृष्टीच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये ताप, उलटी आणि व्हायरल संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने मिळावेत, यासाठी २४ विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, सृष्टीच्या मृत्यूनंतर kalwan ashram school  तिच्या पालकांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना वेळेवर देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. सृष्टीची प्रकृती बिघडल्यानंतर पालकांना आधीच माहिती का देण्यात आली नाही, शाळेत तिच्यावर नेमके कोणते उपचार करण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला का, असे सवाल पालकांनी उपस्थित केले आहेत.सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.