धोनी म्हणाला, ‘तू हे काय केलंस?’

रैनाचा मोठा खुलासा

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Raina's revelation about Dhoni भारतीय क्रिकेटमधील सुरेश रैना आणि एमएस धोनी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही क्षणांतच सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. मात्र, हा निर्णय घेतल्याने धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसला होता, असा खुलासा रैनाने केला आहे.आकाश चोप्राच्या ‘बॅट अँड बॉल’ पॉडकास्टमध्ये रैनाने त्या दिवसाची आठवण सांगितली. धोनीने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:२९ वाजल्यापासून आपल्याला निवृत्त समजावे, असे जाहीर केले होते. त्यानंतर काही वेळातच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. रैनाच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी तो ३२ किंवा ३३ वर्षांचा होता. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज आणि त्या काळातील परिस्थिती पाहता निवृत्ती घेणे योग्य असल्याचे त्याला वाटले. ड्रेसिंग रूममध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय सांगितल्यानंतर धोनीने त्याला, ‘तू हे काय केलंस?’ असे विचारल्याचे रैनाने सांगितले.
 
 
DHONIA
 
निवृत्तीची घोषणा करताना धोनी आणि रैना दोघेही चेन्नई सुपर किंग्सच्या बायो-बबलमध्ये होते आणि आयपीएलसाठी युएईला जाण्याच्या तयारीत होते. कोविड-१९ महामारीमुळे २०२० मधील आयपीएल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळवण्यात आली होती. याच काळात रैनाने धोनीसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले. धोनीने स्वतःच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करून रैनाला वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली होती. रैनाने सांगितले की, धोनीने त्याच्या क्षमतेवर स्वतःपेक्षा अधिक विश्वास दाखवला. त्यामुळे संघासाठी फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही पूर्ण ताकदीने योगदान देण्याची प्रेरणा त्याला मिळाली. धोनीने केलेल्या त्यागाची परतफेड चांगल्या कामगिरीतून करणे आपली जबाबदारी असल्याचे रैनाने म्हटले. पैसा प्रत्येकाकडे असू शकतो, मात्र दुसऱ्यासाठी त्याग करण्यासाठी मोठे मन लागते, असे सांगत रैनाने धोनीसोबतची आपली मैत्री कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.