‘एनएनटीआर’च्या जंगलात दुर्मीळ ‘युरोपियन रोलर’चे दर्शन!

गोंदिया जिल्ह्यातील पहिली नोंद: पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
european roller जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेत आणखी एका दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्याची नोंद झाली आहे. गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प (एनएनटीआर) जंगल परिसरात ‘युरोपियन रोलर’ या आकर्षक व दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली असून वनरक्षक आरती फुले ह्या पक्षीनिरीक्षण करीत असताना हा पक्षी त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पक्ष्याची ओळख पटवून नोंद करण्यात आली. या दुर्मीळ पक्ष्याच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
european roller
 
युरोपियन रोलर हा आकर्षक रंगसंगतीसाठी ओळखला जाणारा स्थलांतरित पक्षी आहे. भारतातील काही भागांत त्याचे दर्शन होत असले तरी महाराष्ट्रात त्याची उपस्थिती अत्यंत कमी प्रमाणात आढळते. त्यामुळे मुरदोली जंगलातील ही नोंद पक्षीवैविध्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील उपलब्ध पक्षीनिरीक्षण नोंदींचा विचार करता युरोपियन रोलरचे दर्शन मोजक्याच ठिकाणी झाल्याचे दिसून येते. यात नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात ५ जून २००५ रोजी या पक्ष्याची नोंद झाली होती. त्यानंतर नागपूरातीलच देगमा जंगल परिसर व हिंगणा रोड येथे २०१४ आणि २०१५ मध्ये त्याच्या नोंदी झाल्या. वर्धा जिल्ह्यातील पिंपळखुटा परिसरात ६ ऑक्टोबर २०२३ रोजीही या पक्ष्याची नोंद करण्यात आली होती. तर सोलापूर जिल्ह्यातील नन्नज माळढोक वन्यजीव अभयारण्य परिसरातील जुन्या पक्षीनोंदींमध्येही युरोपियन रोलरचा उल्लेख आढळतो. यवतमाळ परिसरातील पक्षी यादीतही या पक्ष्याची नोंद असल्याचे सांगितले जात आहे. दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदीमुळे त्यांच्या अधिवासासोबतच परिसरातील अन्नसाखळी व नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करण्यास मदत होते. त्यामुळे मुरदोली जंगलातील युरोपियन रोलरची पहिली नोंद गोंदियाच्या जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.
 
गोंदियाच्या जैवविविधतेत भर
गोंदिया जिल्हा घनदाट जंगल, तलाव, जलस्रोत आणि विविध वन्यजीवांसाठी ओळखला जातो. स्थानिक पक्ष्यांसोबतच विविध ऋतूंमध्ये येथे स्थलांतरित पक्ष्यांचेही आगमन होते. त्यात आता मुरदोली जंगलात युरोपियन रोलरचे दर्शन झाल्याने जिल्ह्याच्या पक्षीवैविध्याचा आणखी एक पैलू समोर आला असून जिल्ह्याच्या जैवविविधतेत भर पडली आहे.
 
एनएनटीआरच्या जंगलातील युरोपियन रोलरची नोंद जिल्ह्याच्या जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून नियमित व शास्त्रीय पद्धतीने पक्षीनिरीक्षण केल्यास भविष्यात आणखी दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी होण्याची शक्यता आहे.
- आरती फुले, वनरक्षक, मुरदोली नर्सरी, नवेगाव-नागझिरा बफर