चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतरण आता पुढच्याच वर्षी

पाण्याचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur medical college येथील बहुप्रतिक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे स्थलांतरण नव्या सुसज्ज इमारतीत येत्या डिसेंबरपर्यंत होण्याचा दावा केला जात असला, तरी लोकार्पणासाठी पुढचे वर्ष उजाळणार आहे. वातानुकुलित 500 खाटांच्या या अत्याधुनिक शासकीय महाविद्यालयाचे बांधकाम तसे पूर्ण झाले आहे. परंतु, अद्यापही तेथे पाण्याची सोय झालेली नाही.
 
 
chandrapur medical college
 
चंद्रपुरात अत्याधुनिक सेवासुविधांनी सज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी गेल्या दशकातच प्रयत्न झाले. त्यात अनेक अडचणी आल्या. शेवटी 2014 मध्ये या महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या नव्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला आणि 2019 मध्ये पायाभरणीचे काम सुरू झाले. 2023 पर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचा प्रस्ताव होता. पण 2019 मध्ये कोवीडमुळे काम थांबले. कोविडनंतर कामाला गती आली. 500 खाटांचे आणि विशेष म्हणजे, पूर्णतः वातानुकुलित असलेले या महाविद्यालयाचे बांधकाम एव्हाना पूर्ण झाले असले, तरी ते सूरू होण्यासाठी 2027 ची पहाट बघावी लागणार आहे.
 
 
या रूग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, एनआयसीयू, पीआयसीयू, शस्त्रक्रिया, डायलिसीससारख्या सुविधा असून, गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तसेच कर्णरोपण किंवा कर्णासंबंधी शस्त्रक्रिया सुविधादेखील असणार आहे. एमआरआय सुविधा, अद्ययावत असे 128 स्लाईस सीटी स्कॅन यंत्रही जनसेवेसाठी सज्ज आहे. एकूण 90 एकर जागेतील या रूग्णालयात हॅलीपॅडचाही प्रस्ताव होता. पण तांत्रिक कारणांनी पुन्हा 16 एकर जागेची मागणी करून तो बाहेर तयार करण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत रूग्णालय सुरू करण्याच्या द्दष्टीने 31 ऑगस्टपासून विभागीय तपासण्या सुरू असून, टप्प्याटप्प्याने विभागांचे स्थलांतरण केले जाईल, असा दावा केला जात आहे.
 
देयकांसाठी आणखी 66 कोटीची गरज: डॉ. कांबळे
रूग्णालयाची नवी इमारत चंद्रपूरकरांच्या सेवेसाठी सज्ज असून, 2026 अखेरपर्यंत स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रस्तावित 614 कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला असून, आणखी 66 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्याची माहिती चंद्रपूर शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.
 
पाण्याची समस्या
पाण्याच्या सुविधेचा प्रश्न कायम असून, तो सोडवण्यासाठी 26 कोटींचा निधी मंजूर आहे. वर्धा नदीतून या नव्या इमारतीत पाणीपूरवठा करण्याची योजना आहे. मात्र, त्याला थोडा अवधी असून, सध्या पाण्यासाठी कुपनलिका टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरच निकाली निघेल, असा दावा केला जात आहे.